Mumbai Best Bus Strike: बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा सातवा दिवस, मुंबईकर त्रस्त
पगारवाढ, मोफत बेस्ट बस प्रवास, कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या उपक्रमातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सेवा खंडित करणे अशा विविध मागण्यांसाठी या संपाची हाक देण्यात आली आहे.
मुंबईत आज सलग सातव्या दिवशी बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप हा सुरुच आहे. पगारवाढ, मोफत बेस्ट बस प्रवास, कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या उपक्रमातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सेवा खंडित करणे अशा विविध मागण्यांसाठी या संपाची हाक देण्यात आली आहे. या संपात भाडेतत्त्वावरील बसचा पुरवठा करणाऱ्या मातेश्वरी, डागा ग्रुप, हंसा, टाटा कंपनी, ओलेक्ट्रा स्विच मोबॅलिटी या कंपन्यांतील कंत्राटी चालक व वाहकांनी गेल्या सात दिवसांपासून बेमुदत संप सुरू केला आहे. मुख्यमंत्र्यांशी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची चर्चा जो पर्यंत होत नाही तो पर्यंत हा संप मागे घेण्यात येणार नाही अशी भुमिका संपकरी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. (हेही वाचा - Mumbai Best Bus Strike: बेस्टच्या कर्मचाऱ्यांना संपामुळे नोटीस, कायदेशीर कारवाईचा इशारा)
मुंबई मध्ये नोकरी, काम धंद्याला जाणार्यांना बेस्टच्या बसचा आधार होता. किफायतशीर दरामध्ये प्रवासी एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाऊ शकतात. तसेच शाळकरी मुलांना देखील बेस्ट बसचा आधार होता. परंतू आता सार्यालाच खीळ बसला आहे. बेस्ट प्रशासन किंवा राज्य सरकार कडूनही अद्याप यावर कोणतीही बैठक आयोजित करून चर्चा झालेली नाही. आज यावर तोडगा काढण्यासाठी चर्चेचं आयोजन होण्याची शक्यता आहे. संपकऱ्यांच्या मागण्यांबाबत कुठलाही तोडगा न निघाल्याने कंत्राटींनी संपावर ठाम असल्याचे स्पष्ट केले.