Mumbai: चोरीचा माल लपवून ठेवण्यासाठी चोराची भन्नाट शक्कल; नाल्यात उतरून मॅनहोलमध्ये ठेवले तब्बल 21 लाखाचे सोने

त्यावेळी नाल्यात उतरल्यामुळे जखम झाल्याचे त्याने सांगितले. नंतर पोलिसांनी या नाल्याची तपासणी केली असता तिथे त्यांना चोरीला गेलेले सोने सापडले. या चोराने यापूर्वी मोबाईल चोरून असेच मॅनहोलमध्ये लपवून ठेवल्याचेही तपासात निष्पन्न झाले

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits : File Image)

चोरी केलेले धन लपवणे ही चोरासाठी एक परीक्षाच असते. सराईत चोर चोरीचा माल नक्की कुठे लपवून ठेवेल हे सांगणे कठीण. आता मुंबईमध्ये (Mumbai) अशीच एक चोरीची घटना उघडकीस आली आहे. मुंबईच्या जुहू पोलिसांनी (Juhu Police) 17 वर्षांच्या अल्पवयीन चोरट्यास अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्याने सोन्याची चोरी केली होती आणि मॅनहोलमध्ये (Manhole) ते सोने लपवून ठेवले होते. पोलिसांनी त्याला अटक केली असता त्याच्याकडून 21 लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, नेहरू नगर भागात राहणारी पूजा आपल्या कुटुंबासमवेत महाबळेश्वरला गेली होती. जेव्हा ती महाबळेश्वरहून परत आली तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण घरात ठेवलेले सुमारे 21 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने गायब झाले होते. घरात चोरी झाली आहे हे समजण्यास पूजाला वेळ लागला नाही. पूजाने तिच्या जवळच्या जुहू पोलिस स्टेशनमध्ये जाऊन या प्रकरणी एफआयआर नोंदविला. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासणी दरम्यान पोलिसांच्या लक्षात आले की, पूजाच्या कुटूंबाचा एकही सदस्य त्यावेळी घरात नव्हता त्यामुळे संशयाची सुई आसपासच्या लोकांवर फिरली.

पोलिसांनी परिसरातील रहिवासी असलेल्या गुन्हेगार लोकांची चौकशी सुरू केली. यावेळी पोलिसांना पार्टी करणाऱ्या एका मुलावर संशय आला. पोलिसांनी तपास केला असता, तो मुलगा नववी नापास असल्याचे समजले आणि तो काम शोधत होता. त्याचे वडील टेम्पो चालक आहेत. अशा वाईट परिस्थितीत पार्टीसाठी पैसे कुठून आले? असा प्रश्न पोलिसांना पडला. त्यानंतर त्याला चौकशीसाठी बोलावले असता त्याने चोरीची कबुली दिली. (हेही वाचा: कुख्यात गुंड अरुण गवळी यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रकृती उत्तम, जावई अक्षय वाघमारे याने दिली माहिती)

त्याच्या शरीरावरील जखमा पाहिल्यानंतर त्याची कसून चौकशी केली गेली. त्यावेळी नाल्यात उतरल्यामुळे जखम झाल्याचे त्याने सांगितले. नंतर पोलिसांनी या नाल्याची तपासणी केली असता तिथे त्यांना चोरीला गेलेले सोने सापडले. या चोराने यापूर्वी मोबाईल चोरून असेच मॅनहोलमध्ये लपवून ठेवल्याचेही तपासात निष्पन्न झाले.