IPL Auction 2025 Live

Mumbai: माहीम परिसरात 57 इंच व्यासाची मुख्य जलवाहिनी फुटली; दादर, माटुंगा व इतर भागात पाणीपुरवठा विस्कळीत

यामुळे रस्त्यावर अक्षरशः पूरस्थिती निर्माण झाली आहे. जी/दक्षिण आणि जी/उत्तर विभागातील माहीम येथील मच्छिमार कॉलनी जवळ अरुणकुमार वैद्य मार्गावर मृदंगाचार्य मैदान लगत, 57 इंच व्यासाची मुख्य जलवाहिनी आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास फुटली.

Water pipeline bursts in Mumbai's Mahim area (Photo Credits: ANI)

आज मुंबईमध्ये जलवाहिनी फुटली आहे. यामुळे रस्त्यावर अक्षरशः पूरस्थिती निर्माण झाली आहे. जी/दक्षिण आणि जी/उत्तर विभागातील माहीम येथील मच्छिमार कॉलनी जवळ अरुणकुमार वैद्य मार्गावर मृदंगाचार्य मैदान लगत, 57 इंच व्यासाची मुख्य जलवाहिनी आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास फुटली. यामुळे जी/दक्षिण आणि जी/उत्तर विभाग अंतर्गत माहिम (प), माटुंगा (प), दादर (प), प्रभादेवी या परिसरामधील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. सदर जलवाहिनी फुटल्याने आज दुपारी 4 ते सायंकाळी 7 या कालावधीत दादर, प्रभादेवी, एलफिन्स्टन या परिसरांमध्ये पाणीपुरवठा करता आला नाही.

तसेच, शिवाजी पार्क, माहिम येथे देखील सायंकाळी 7 ते रात्री 10 या कालावधीतील पाणी पुरवठा करणे शक्य झालेले नाही. सदर जलवाहिनी वरील गळतीचे नेमके ठिकाण शोधून दुरुस्ती करण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. दुरुस्तीच्या कालावधीत संबंधित भागातील नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. (हेही वाचा: महाराष्ट्रात थंडीची चाहूल, किमान तापमानात घसरण)

दरम्यान, याआधी महापालिकेच्या जी दक्षिण विभागात असलेली ब्रिटिशकालीन तानसा (पूर्व) मुख्य जलवाहिनी फुटली होती. 18 नोव्हेंबरपासून त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु होते व ते बुधवार, 3 डिसेंबरच्या मध्यरात्री संपले. सुरूवातीला बाहेरून जलवाहिनीची गळती बंद करण्यासाठी प्रयत्न केले गेले. मात्र गळती थांबली नसल्याने पाणीपुरवठा बंद करण्यात आला. जलवाहिनी दुरुस्तीचे काम हे अतिशय धोकादायक आते. याआधी शहरातील कुर्ला पूर्वेकडील सुमन नगर परिसरात महापालिकेच्या जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम सुरू होते. यावेळी BMC चे 7 कर्मचारी जलवाहिनी दुरुस्तीचे काम करत होते. परंतु, दुर्दैवाने या कर्मचाऱ्यांना विजेचा धक्का लागला. यात दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले.