Mumbai: मुंबईच्या KEM Hospital मध्ये 23 MBBS विद्यार्थ्यांना Covid-19 ची लागण; घेतला आहे लसीचा पहिला डोस
या साथीच्या संकटाच्या दरम्यान गुरुवारी मुंबईच्या (Mumbai) केईएम रुग्णालयात 23 एमबीबीएस (MBBS) विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी समोर आली
महाराष्ट्रातील कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नाही, येथे दररोज तीन हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत. या साथीच्या संकटाच्या दरम्यान गुरुवारी मुंबईच्या (Mumbai) केईएम रुग्णालयात 23 एमबीबीएस (MBBS) विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी समोर आली. सर्व संक्रमित विद्यार्थ्यांनी कोविड लसीचा किमान एक डोस घेतला आहे, त्यापैकी अनेकांना सौम्य लक्षणे आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी ही माहिती दिली आहे.
महापौर किशोरी पेडणेकर पुढे म्हणाल्या की, रुग्णालयात एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना संसर्ग होणे हे कॉलेजमधील एखाद्या सांस्कृतिक किंवा क्रीडा कार्यक्रमाचा परिणाम आहे. केईएम रुग्णालय मुंबईतील मोठ्या रुग्णालयांपैकी एक असल्याचे सांगितले जाते. या हॉस्पिटलमध्ये कोरोना वॉरियर्सचा सन्मान करताना हवाई दलाने फुलांचा वर्षाव केला होता. मुंबईतील या कोरोना स्फोटामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे. विद्यार्थ्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यातल्या त्यात सकारात्मक गोष्ट म्हणजे त्यापैकी कोणामध्येही गंभीर लक्षणे नाहीत.
केईएम रुग्णालयाचे डीन डॉ.हेमंत देशमुख म्हणाले की, महाविद्यालयात एकूण 1100 विद्यार्थी उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी, मध्य प्रदेशातील महू, इंदूर येथील आर्मी वॉर कॉलेजचे 30 वरिष्ठ, कनिष्ठ आणि प्रशिक्षणार्थी अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. या सर्वांना कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले होते. (हेही वाचा: महाराष्ट्रातील खाजगी रुग्णालयांमध्ये 75 टक्के Covid-19 रुग्णांकडून आकारले ज्यादा बिल; अनेक कुटुंबे झाली कर्जबाजारी)
या महिन्याच्या सुरुवातीला, ब्रेकथ्रू इन्फेक्शन्सवरील एका सर्वेक्षण अहवालात असे म्हटले आहे की, मुंबईत सुमारे 2.5 दशलक्ष लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, परंतु यापैकी 7,057 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 52% लोक 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. जर आपण महाराष्ट्रातील कोरोनाव्हायरसची प्रकरणे बघितली तर दररोज जास्तीत जास्त संसर्ग प्रकरणे नोंदवण्याच्या बाबतीत राज्य अजूनही दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावर आहे. राज्य आरोग्य मंत्रालयाच्या शेवटच्या अपडेटनुसार, बुधवारी महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 3,187 नवीन प्रकरणे नोंदली गेली आणि आणखी 49 रुग्णांचा मृत्यू झाला.