Mumbai: नेरुळ-सिबीडी रेल्वे स्थानकादरम्यान 2 ट्रेन आमने-सामने; मोठा अनर्थ थोडक्यात टळला, लोकलसेवा विस्कळीत
मुंबई (Mumbai) येथील हार्बर मार्गावर (Harbour Line) नेरूळ- सिबीडी बेलापूर रेल्वे स्थानकादरम्यान (Nerul-CBD Belapur Railway Station) 2 लोकल एकाच रुळावर आल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
मुंबई रेल्वे (Mumbai Railway) सेवेच्या हार्बर मार्गावरील (Harbour Line) नेरूळ- सिबीडी बेलापूर रेल्वे स्थानकादरम्यान (Nerul-CBD Belapur Railway Station) धक्कादायक घटना घडली असून दोन्ही लोकल रेल्वे एकाच रुळावर आमने-सामने आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान दोन्ही लोकल रेल्वे जागेवर थांबवण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. तसेच या घटनेमुळे दोन्ही लोकलमधून प्रवास करत असलेल्या प्रवशांना पुढील रेल्वे स्थानकापर्यंत पायी चालत जावे लागले आहे. मुंबई लोकल रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशाप्रकारची घटना घडली आहे. सध्या हार्बर मार्गावरील लोकसेवा विस्कळीत झाली असून रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.
मुंबई येथील लोकल रेल्वेतून मोठ्या संख्येने प्रवाशी ये- जा करत असतात. प्रचंड गर्दी आणि त्यात प्रवेश करू इच्छिणारे लाखो प्रवासी यांची दररोज घालमेल होत असते. छोटासाही बिघाड झाला तरी लाखो प्रवाशांचे हाल होतात. यातच आज नेरुळ- सिबीडी रेल्वे स्थानकादरम्यान 2 लोकल एकाच रुळावर आमने-सामने आल्याने प्रवाशांना धक्का बसला आहे. एक लोकल पनवेलवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जात होती तर, दुसरी लोकल CSMTहून पनवेलकडे जात होती. रुळांच्या क्रासिंग यंत्रणेत बिघाड झाल्याने या दोन्ही लोकल एकमेकांसमोर आल्या होत्या असे बोलले जात आहे. हे देखील वाचा- नवी मुंबई: पनवेल टर्मिनल्समधून धावणार 11 नव्या लांब पल्ल्याच्या गाड्या
रेल्वे प्रशासनाने प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, पनवेलकडे जाणाऱ्या हार्बर मार्गावर तांत्रिक बिघाड झाला हे खरे आहे. मात्र दोन लोकल ट्रेन्स एकमेकांसमोर आल्या नाहीत असे स्पष्टीकरण रेल्वे प्रशासनाने दिले आहे. या लोकल या पाठोपाठ आल्या होत्या. पण गार्डला जेव्हा काहीचूक असल्याचे आढळले तेव्हा त्यांनी लोकल थांबवल्या होत्या, असेही रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.