Mumbai: ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारकांविरूद्ध 1,650 तक्रारी प्राप्त; 654 परवानाधारकांचे परवाने निलंबित

परवानाधारकांनी नागरिकांना चांगली सेवा द्यावी आणि नागरिकांशी गैरवर्तन करू नये, असे आवाहन या कार्यालयाकडून करण्यात येत आहे.

Riksha Taxi (Photo credit - file)

ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी (Autorickshaw and Taxi License Holders) गैरवर्तन करणे, भाडे नाकारणे, विहित दरापेक्षा जादा भाडे घेणे याविरुद्ध तक्रार करायची असल्यास व्हॉट्सअप क्रमांकावर तक्रार करता येणार आहे. त्यासाठी  9152240303 क्रमांक व mh03autotaxicomplaint@gmail.com ई-मेल आयडी प्रादेशिक परिवहन अधिकारी (पूर्व) यांनी उपलब्ध करून दिला आहे. ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारकांविरुद्ध आतापर्यंत 1650 तक्रारी प्राप्त झाल्या असून 654 परवानाधारकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे.

व्हॉट्सॲप व ई-मेल आयडीवर 11 जुलै 2023 ते 31 जानेवारी 2024 पर्यंत 1650 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. संबंधित कार्यालयाशी निगडित 717 तक्रारी आहेत. त्यापैकी 604 तक्रारी या ऑटोरिक्षा व 113 तक्रारी या टॅक्सी सेवे संबंधीत आहेत. तक्रारींमध्ये 540 तक्रारी ठोस कारणाशिवाय भाडे नाकारणे, 52 तक्रारी या मीटरप्रमाणे देय असलेल्या भाड्यापेक्षा जादा भाडे आकारणे व 125 तक्रारी प्रवाश्यांशी गैरवर्तन करण्याबाबत प्राप्त झाल्या आहेत. त्याचप्रमाणे 717 परवानाधारकांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आल्या आहेत.

दोषी आढळलेल्या एकूण 654 परवानाधारकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. यापैकी 503 परवानाधारकांचे ठोस कारणांशिवाय भाडे नाकारणे या कारणासाठी परवाने 15 दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईत 58 वाहनधारकांकडून 1 लाख 45 हजार 500 रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहेत. तसेच 105 परवानाधारकांचे प्रवाशांशी गैरवर्तन करणे, 46 परवानाधारकांचे मीटरप्रमाणे देय असलेल्या पेक्षा जादा भाडे आकारणे या कारणासाठी परवाना 10 दिवसांसाठी निलंबित करण्यात आला आहे. या सर्व प्रकारांमध्ये एकूण 82 प्रकरणात 2 लाख 4 हजार रुपये तडजोड शुल्क वसूल केले आहे.

तसेच 31 तक्रारींबाबत तक्रारदारांनी चुकीची तक्रार नोंद केल्याबाबत तक्रारदारांना अवगत केले आहे. तसेच सद्यस्थितीत परवाना निलंबित करण्यात आलेल्या 572 वाहनांची वाहन 4.0 प्रणालीवर ‘नॉट टू बी ट्रान्सक्टेड’ नोंद (पाहिजे नोंद) घेण्यात आली आहे. कारवाईच्या माहितीबाबत तक्रारदारांना व्हॉट्सॲप व ई-मेल आयडीवर या माध्यमांतून अवगत करण्यात आले आहे. (हेही वाचा: FlixBus in India: जर्मन कंपनी फ्लिक्सबसने भारतात सेवा सुरू केली सेवा; अवघ्या 99 रुपयांमध्ये करू शकणार सुरक्षित प्रवास, तिकीट विक्री चालू)

प्रवासी नागरिकांनी संबंधित कार्यालयाकडे केलेल्या तक्रारींची कार्यालयाकडून गांभीर्याने दखल घेण्यात येत आहे, याबाबत प्रवाश्यांनी आश्वस्त रहावे. परवानाधारकांनी नागरिकांना चांगली सेवा द्यावी आणि नागरिकांशी गैरवर्तन करू नये, असे आवाहन या कार्यालयाकडून करण्यात येत आहे. खोटी तक्रार दाखल करणे हा भारतीय दंड विधान कलम 192, 193, 199 व 200 अंतर्गत दंडनीय अपराध आहे. या कार्यालयाकडून सुरू करण्यात आलेल्या प्रवासी तक्रार मदत कक्षाला नागरीक उत्तमप्रकारे प्रतिसाद देत आहेत. नागरिकांना ऑटोरिक्षा/टॅक्सी चालकांकडून गैरवर्तन भाडे नाकारणे, विहित दरापेक्षा जादा दराने भाडे आकारणे आदी तक्रारी असतील, तर 9152240303 या व्हॉट्सॲप क्रमांकावर आणि mh०३autotaxicomplaint@gmail.com या ईमेल आयडीवर योग्य त्या पुराव्यासह तक्रार दाखल करावी, असे आवाहन विनय अहीरे, प्रादेशिक परिवहन अधिकारी (पूर्व) कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.