Mulayam Singh Yadav Dies: महाराष्ट्राचे राज्यपाल BS Koshyari ते केंद्रीय मंत्री Ramdas Athawale यांच्याकडून मुलायम सिंह यादव यांना श्रद्धांजली अर्पण करताना जुन्या आठवणींना उजाळा

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि अजित पवारांनीही आपला शोक व्यक्त केला आहे.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय संरक्षणमंत्री मुलायम सिंह (Mulayam Singh Yadav) यांचे गुरूग्रामच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये (Medanta Hospital) निधन झाले. अतिदक्षता विभागामध्ये उपचार घेत असलेल्या मुलायम सिंह यांची आज सकाळी 8.16 वाजता प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर अनेकांनी शोक व्यक्त करत भारतीय राजकारणातील एक मुरब्बी नेता आणि युपीचे 'नेताजी' गेल्याची भावना व्यक्त केली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि अजित पवारांनीही आपला शोक व्यक्त केला आहे. CM Eknath Shinde: उत्तर प्रदेशच्या जडणघडणीत मुलायम सिंह यांचे मोठे योगदान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून मुलायम सिंह यादव यांना श्रध्दांजली .

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मुलायमसिंह यादव हे देशाच्या आणि विशेषतः उत्तर प्रदेश राज्याच्या राजकारणातील एक धुरंधर नेते होते. व्यापक जनसंपर्क व संघटन कौशल्यामुळे त्यांची राजकारणावरील पकड कायम राहिली. उत्तम संसदपटू असलेल्या मुलायमसिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री तसेच केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणून उत्तम काम केले होते. आपण उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सदस्य होण्यापूर्वीपासूनच आपला मुलायमसिंह यादव यांचेशी घनिष्ट परिचय होता. सर्व पक्षातील लोकांशी त्यांचे अतिशय मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यांच्या निधनामुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणातील एक मोठा अध्याय संपला आहे. दिवंगत मुलायमसिंह यादव यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो व आपल्या शोकसंवेदना श्री अखिलेश यादव तसेच त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना कळवतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशामध्ये म्हटले आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नेताजी मुलायम सिंग यादव यांच्या निधनाने समाजवादी चळवळीचा आधारवड हरपला असल्याची भावना बोलून दाखवली आहे. समाजवादी पक्षाचे संस्थापक माजी संरक्षणमंत्री मुलायम सिंह यादव यांच्या निधनाने देशाची हानी झाली असून देशाने एक अनुभवी सर्वात ज्येष्ठ समाजवादी आधारवड गमावला आहे आशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिवंगत मुलायम सिंह यादव यांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.कालच मेदंता रुग्णायलय गुडगाव येथे जाऊन मुलायम सिंह यादव यांचे पुत्र अखिलेश यादव यांची भेट घेऊन मुलायम सिंह यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती. यावेळी शिवपाल यादव आणि राम गोपाल यादव सुद्धा उपस्थित होते. समाजवादी पक्षाचे संस्थापक नेताजी मुलायम सिंह यादव यांच्या शी माझे अत्यंत चांगले संबंध होते.महाराष्ट्रात मी रिपब्लिकन डावी लोकशाही समिती ( रिडालोस ) नावाने तिसरी आघाडी बनविली तेंव्हा आम्ही एकत्र काम केले.अनेक उमेदवारांचा निवडणूक प्रचार आम्ही एकत्र हेलिकॉप्टर मधून आम्ही केला होता. त्यांच्या अनेक आठवणी आहेत. देशातील सर्वात ज्येष्ठ समाजवादी नेतृत्व म्हणून मुलायम सिंह यांना लोक आदराने नेताजी म्हणत असत. उत्तर प्रदेश चे माजी मुख्यमंत्री; देशाचे माजी संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी देशासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांचा ग्रामीण भागात; शेतकरी आणि कृषी बाबत दांडगा अनुभव होता. गरिबांसाठी ते सतत तळमळ ठेऊन काम करीत होते. डॉ राम मनोहर लोहिया यांच्या तालमीत ते तयार झालेले नेते होते. त्यांचा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर विश्वास होता. त्यांची माझी संसदेत नेहमी भेट व्हायची. ते लढाऊ नेते झुंजार खासदार आणि कायम जमिनीशी जोडलेले राष्ट्रीय नेते होते. उत्तर प्रदेशात ते मुख्यमंत्री असताना रिपब्लिकन पक्षाला त्यांनी साथ दिली. गरिबांची जाणीव असणारा शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी लढणारा समाजवादी सूर्य मुलायम सिंह यांच्या निधनाने मावळला आहे अशी शोकभावना रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.

सर्व समाजघटकांना सोबत घेऊन जाणारा, दुर्बल वंचित उपेक्षित घटकांसाठी लढणारा समाजवादी चळवळीचा आधारस्तंभ हरपला असल्याची भावना महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी बोलून दाखवली आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री म्हणून त्यांचं योगदान कायम लक्षात राहील. मी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्ष श्री. अखिलेश यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या तसेच समाजवादी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या दुःखात सहभागी आहोत, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करीत मुलायमसिंह यादव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now