Mucormycosis: म्युकरमायकोसीस आजारावरील उपचारांसाठी केंद्राने महाराष्ट्राला झुकते माप द्यावे- राजेश टोपे

महाराष्ट्र सरकार ही इंजेक्शन्स मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतू, काही कारणांमुळे ही इंजेक्शन 31 मे नंतर उपलब्ध होतील. त्यामुळे महाराष्ट्रात म्युकरमायकोसीस संक्रमित रुग्णांसाठी पुढचे 10 दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत.

Mucormycosis: म्युकरमायकोसीस आजारावरील उपचारांसाठी केंद्राने महाराष्ट्राला झुकते माप द्यावे- राजेश टोपे
Mucormycosis | (File Image)

कोरोना व्हायरस प्रादुर्भाव राज्यात कायम असताना काळी बुरशी म्हणजेच म्युकरमायकोसीस (Mucormycosis) आजारही राज्यात डोके वर काढतो आहे. त्यामुळे राज्य सरकार या आजाराबाबत सतर्क झाले आहे. राज्यात आजघडीला म्युकरमायकोसीस आजाराचे 800 ते 850 रुग्ण आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, राज्यातील काळी बुरशी (Black Fungus) संक्रमित रुग्णांची वाढती संख्या पाहता आपल्याला साधारण 2 लाख इंजेक्शनची गरज आहे. महाराष्ट्र सरकार ही इंजेक्शन्स मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतू, काही कारणांमुळे ही इंजेक्शन 31 मे नंतर उपलब्ध होतील. त्यामुळे महाराष्ट्रात म्युकरमायकोसीस संक्रमित रुग्णांसाठी पुढचे 10 दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. म्युकरमायकोसीस रुग्णांची वाढती संख्या पाहता केंद्र सरकारने महाराष्ट्राला औषध पुरवठ्यासाठी अधिक झुकते माप द्यावे, असेही राजेश टोपे या वेळी म्हणाले.

राजेश टोपे यांनी सांगितले की, म्युकरमायकोसीस आजाराबाबतची सर्व औषधे आणि इतर गोष्टींच्या हाताळणीबाबतचे सर्वाधिकार केंद्र सरकारने आपल्या हातात घेतले आहेत. त्यामुळे आम्ही केंद्र सरकारशी बोलत आहोत. म्युकरमायकोसीसच्या उपचारांसाठी आवश्यक इंजेक्शनबाबतही आम्ही केंद्र सरकारच्या संबंधित विभागाशी बोललो आहे. परंतू, त्यांनीही औशधांची उपलब्धता नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, साराभाई कंपनीकडून कच्चा माल घेऊन वर्धा आणि पालघर येथील उत्पादकांकडून हे इंजेक्शन बनवून घेण्याची महाराष्ट्राची तयारी असल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Mucormycosis: म्यूकरमायकोसीस आजाराचा राज्यात प्रादुर्भाव; पुणे शहरात सर्वाधिक 318 जणांना संसर्ग, 20 जण दगावल्याचे वृत्त)

म्युकरमायकोसीस आजारांबाबत राज्य सरकारची महत्त्वपूर्ण उपययोजना

दरम्यान, केंद्रातील विभागाने महाराष्ट्राला 2 किलो कच्चा माल पुरविण्याचे मान्य केले आहे. एका किलोमध्ये साधारण 20 हजार इंजेक्शन तयार होतात. अशा माध्यमातूनही महाराष्ट्रासाठी इंजेक्शन्स उपलब्ध करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.