Ganpati Utsav 2020: कोरोना काळात नियम पाळून एसटीने कोकणात जाता येणार- अॅड. अनिल परब
दरम्यान, कोरोना व्हायरस संकट आणि लॉकडाऊन ही अडचण कायम असतानाही राज्य सरकारने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयामूळे बहुसंख्य कोकणवासियांची अडचण दूर झाली आहे.
गणेशोत्सव (Ganpati Utsav 2020) काळात कोकणातील आपल्या मूळ गावी जावू इच्छिणाऱ्यांसाठी राज्य सरकारने परीवहन सेवा (MSRTC) उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. परीवहन मंत्री अॅड. अनिल परब (Anil Parab) यांनी ही माहिती दिली आहे. मुंबईत वास्तव्यास असणाऱ्या असंख्य नागरिकांना कोकणात जाण्यासाठी परीवहन सेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. मात्र, या सेवेचा लाभ घेत असताना नागरिकांना सरकारच्या अटी आणि शर्थींचे पालन करावे लागणार अहे असेही, अॅड. परब म्हणाले.
कोरोना व्हायरस संकट आणि लॉकडाऊनची अडचण पाहता, मुंबई शहरात वास्तव्यास असलेल्या असंख्य कोकणवासीयांना यंदाच्या वर्षीही गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नेहमीप्रमाणेच कोकणातील आपल्या मूळ गावी जाता येणार की नाही याबाबत अनिश्चितता होती. दरम्यान, कोरोना व्हायरस संकट आणि लॉकडाऊन ही अडचण कायम असतानाही राज्य सरकारने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयामूळे बहुसंख्य कोकणवासियांची अडचण दूर झाली आहे.
अॅड. अनिल परब यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आज सांगितले की, मुंबईतून एसटीने कोकणात जाण्यासाठी असणारी नियम व अटी यांबाबतची माहिती लवकरच दिली जाईल. कोकणामध्ये गणपती उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो, याची सरकारला कल्पना आहे. मात्र, राज्यावरील कोरोना व्हायरस संकट विचारात घेता यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा केला जावा, असे अवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे, अशी आठवणही अॅड. परब यांनी करुन दिली. (हेही वाचा, श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्ट करणार शहीद सुनिल काळे यांच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च)
दरम्यान, कोकणात सोडण्यात येणाऱ्या एसटी सेवेसाठी आयसीएमआरच्या गाईडलाइन मागवल्या आहेत. सर्व गोष्टींचा काळजीपूर्वक अभ्यास करुनच एसटी सेवा उपलब्ध करुन दिली जाईल, असे अॅड. परब यांनी या वेळी सांगितले. यासोबतच गणेशोत्सव साधेपणाने साजर होईल, गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याचीही काळजी नागरिकांनी घ्यायची आहे. ज्यांची घरे बंद असतात आणि जे फक्त गणेशोत्सवासाठीच कोकणात जातात, अशा लोकांना कोकणात पाठविण्याची जबाबदारी राज्य सरकार घेईल, असेही परब यांनी या वेळी सांगितले.