MSRTC च्या ताफ्यात येणार इलेक्ट्रिक बस; 1जूनला पहिली इलेक्ट्रिक एसटी बस धावणार

'शिवाई' असं या बसचं नाव असणार आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) वर्धापन दिनी अर्थात 1 जूनला राज्यात पहिली इलेक्ट्रिक एसटी बस (Electric ST Bus) धावणार आहे. ज्या मार्गात राज्यात पहिली एसटी बस धावली होती त्याच मार्गावर म्हणजे पुणे-अहमदनगर मार्गावर पहिली इलेक्ट्रिक एसटी बस चालवली जाणार आहे. 'शिवाई' असं या बसचं नाव असणार असून या वर्षाअखेरीस 3 हजार पर्यावरणपूरक गाड्या महामंडळामध्ये दाखल होणार आहेत. हे देखील नक्की वाचा: महाराष्ट्र परिवहन मंडळाने 'शिवाई' एसटी लॉन्च; एकदाच चार्ज केल्यावर 300 किमी पल्ला गाठणार .

भारतामध्ये सार्वजनिक प्रवासी वाहतुकीमध्ये पर्यावरणपूरक गाड्यांचा समावेश वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून 'फेम' योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार इलेक्ट्रिक बससाठी केंद्राकडून विशेष सवलत दिली जाते. त्यामुळे या योजनेअंतर्गत आता एमएसआरटीसी ला 1 हजार इलेक्ट्रिक बस आणि 2 हजार सीएनजीवर चालणार्‍या बस मिळणार आहेत. त्यामधील पहिल्या टप्प्यात 150 इलेक्ट्रिक बस जून महिन्यात दाखल होतील तर वर्षाअखेर एकूण 1 हजार बस दाखल होणार आहेत.

शहरात सीएनजी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे मुंबई-पुणे-नाशिक या भागातील एसटी सेवा या सीएनजी वर चालणार्‍या बसच्या असतील. ग्रामीण भागात डिझेल वर चालणार्‍या एसटी सुरू राहतील असे सांगण्यात आले आहे.

मागील 5 महिने एसटी कर्मचारी संपावर होते. त्यांच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलनात सहभागी असलेल्या कर्मचार्‍यांची तूर्तास मनधरणी झाल्याने ते कामावर पुन्हा रूजू झाले आहेत. त्यामुळे 2 वर्ष कोरोना आणि नंतर संपामुळे विस्कळीत झालेली एसटी सेवा आता पुन्हा पूर्वपदावर आणण्याचं मोठं आवाहन महामंडळासमोर आहे.