सक्तीचे केलेले NCMC Card अवघ्या काही दिवसांतच अडचणीत, ST ने घेतला यू-टर्न
एनसीएमसी कार्ड यंत्रणेवरील वाढत्या ताणामुळे तांत्रिक अडचणी येत असल्याने, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत जुन्या पद्धतीने सवलतीचे तिकीट काढण्याची मुभा दिली आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) एनसीएमसी कार्ड यंत्रणेवर वाढलेल्या ताणामुळे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या असून, त्यामुळे महामंडळाने ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना 30 सप्टेंबर 2026 पर्यंत जुन्या पद्धतीने सवलतीचे तिकीट काढण्याची मुभा दिली आहे. एसटीने 1 सप्टेंबरपासून सवलतीच्या प्रवासासाठी एनसीएमसी कार्ड सक्तीचे केले होते, त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच हा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे.
प्रवाशांना तात्पुरता दिलासा
एसटी महामंडळाने जारी केलेल्या सुधारित परिपत्रकानुसार, एनसीएमसी सर्व्हरवरील 'हिट्स'च्या संख्येत झालेल्या वाढीमुळे कार्डद्वारे सवलतीचे तिकीट काढण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे पात्र प्रवाशांसाठी 30 सप्टेंबरपर्यंत जुनी पद्धत अवलंबण्याचे निर्देश सर्व आगारांना देण्यात आले आहेत.
मात्र ज्या प्रवाशांकडे आधीच सक्रिय एनसीएमसी कार्ड आहे, त्यांना सवलतीचा लाभ घेण्यासाठी कार्डचाच वापर करावा लागणार आहे. सक्रिय कार्ड वाचता येत नसेल किंवा कार्डद्वारे तिकीट देण्यात तांत्रिक अडचण येत असेल, अशा परिस्थितीत वाहकांना जुन्या पद्धतीने सवलतीचे तिकीट देण्याची मुभा देण्यात आली आहे. नक्की वाचा: एसटी प्रवासात NCMC Card सक्तीमुळे राज्यभरात गोंधळ; जाणून घ्या कसं, कुठे काढाल कार्ड .
एसटी महामंडळाने राज्यभरातील विभागीय नियंत्रक आणि आगार व्यवस्थापकांना याबाबतची सुधारित कार्यपद्धती वाहक आणि चालक-वाहकांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश दिले आहेत.
एनसीएमसी यंत्रणेतील तांत्रिक अडचणी
डिजिटल यंत्रणेच्या दिशेने एक पाऊल म्हणून एसटीने ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी एनसीएमसी कार्ड सक्तीचे केले होते. मात्र प्रवाशांच्या वाढत्या वापरामुळे कार्ड यंत्रणेवर अतिरिक्त ताण पडत असून, तिकीट देताना तांत्रिक अडचणी उद्भवत असल्याचे समोर आले आहे.
पात्र प्रवाशांना सवलतीपासून वंचित राहू नये यासाठी उपाय
तांत्रिक अडचणींमुळे पात्र प्रवाशांना सवलतीपासून वंचित राहावे लागू नये, या उद्देशाने हा तात्पुरता दिलासा देण्यात आला असल्याचे एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ३० सप्टेंबरपर्यंत जुनी तिकीट प्रणाली उपलब्ध राहणार असून, त्याचवेळी एनसीएमसी यंत्रणा सुरळीत करण्याचे काम एसटी महामंडळाकडून सुरू राहणार आहे.
नव्या बसगाड्यांच्या ताफ्यातही वाढ
दरम्यान, एसटी महामंडळाने राज्यातील जुना ताफा बदलण्यासाठी पाच हजार नव्या लालपरी बसगाड्यांच्या खरेदीची निविदा प्रक्रियाही नुकतीच पूर्ण केली आहे. डिजिटायझेशन आणि ताफ्याच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने एसटी महामंडळाची ही वाटचाल सुरू असतानाच, एनसीएमसी कार्ड यंत्रणेतील ही तांत्रिक अडचण समोर आली आहे.