MSRTC Employee Protest: एसटी कर्मचाऱ्यांच्या राहिलेल्या मागण्यांसंदर्भात दिवाळीनंतर होणार चर्चा; सध्या संप मागे घेण्याचे मंत्री अनिल परब यांचे आवाहन

संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने आपापल्या कामावर रूजू व्हावे व दिवाळी सणादरम्यान सर्वसामान्य जनतेची गैरसोय टाळावी, असेही परिवहनमंत्री श्री.परब यांनी यावेळी सांगितले

मंत्री अनिल परब | (File Photo)

काही दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी महामंडळाच्या (MSRTC) कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. यामधील अनेक मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत मात्र अजूनही ऐन दिवाळीमध्ये एमएसआरटीसीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी संप सुरु आहे. एसटी ही सर्वसामान्य माणसांची जीवनवाहीनी आहे. दिवाळीच्या तोंडावर प्रवाशी जनतेची गर्दी वाढणार आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवासाची गैरसोय टाळण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर तातडीने रुजू व्हावे असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केले आहे.

परब म्हणाले आहेत की, जनतेची एसटीवरील विश्वासर्हता जपण्यासाठी तसेच जनतेची एसटीशी असलेली नाळ तशीच जोडली राहावी यासाठी अघोषित संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर तातडीने रुजू व्हावे. परब म्हणाले, दिवाळी सणाच्या पार्श्वभूमिवर ऑक्टोबर महिन्याचे वेतन नोव्हेंबर महिन्याच्या 1 तारखेला म्हणजेच दिवाळीपूर्वी देण्याची जाहीर केले होते. त्यानुसार सुधारीत महागाई व घरभाडे भत्त्यासह ऑक्टोबर 2021 चे वेतन त्याचबरोबर दरवर्षी दिली जाणारी दिवाळी भेट आज सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.

राहिलेल्या मागण्यांसंदर्भात एसटी महामंडळ सकारात्मक आहे. यावर दिवाळीनंतर चर्चा करण्यात येणार आहे. गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे एसटी महामंडळ प्रचंड आर्थिक अडचणीत असताना देखील आतापर्यंत सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात आलेआहे. सध्या 85 टक्के आगारातील वाहतूक सुरुळीत सुरु असून उर्वरीत 15 टक्के आगारातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ही विस्कळीत वाहतूक पूर्ववत करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे. (हेही वाचा: MSRTC Employee Protest: राज्यात्त एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन; ऐन दिवाळीत 250 पैकी 38 बस डेपो बंद)

संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने आपापल्या कामावर रूजू व्हावे व दिवाळी सणादरम्यान सर्वसामान्य जनतेची गैरसोय टाळावी, असेही परिवहनमंत्री श्री.परब यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, एमएसआरटीसीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी चालू असलेल्या आंदोलनामुळे 250 पैकी 38 बस डेपो बंद आहेत. एमएसआरटीसीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सर्वाधिक औरंगाबाद विभागातील 47 पैकी 15 डेपो बंद आहेत.