मानखुर्द-वाशी दरम्यान मुंबई लोकलवर दगडफेक, या दगडफेकीत मोटरमन गंभीर जखमी
यात मोटरमन गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेची बातमी लागताच आरपीएफ जवान घटनास्थळी दाखल झाले.
मुंबईत लोकलवर दगडफेक करण्याचे प्रकार दिवसेंदिवस गंभीर रुप धारण करत आहेत. टीव्ही 9 ने दिलेल्या माहितीनुसार, मानखुर्द-वाशी (Mankhurd-Vashi) दरम्यान लोकलवर दगडफेक करण्यात आली आहे. यात मोटरमन गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या दगडफेकीत त्याच्या डोक्याला जबर मार लागला आहे. घटनेची बातमी लागताच आरपीएफ जवान घटनास्थळी दाखल झाले.
बेलापूरहून-सीएसएमटी कडे जाणारी ही लोकल होती. ही दगडफेक कशामुळे व कोणी केली याचा आरपीएफ जवान तपास करत आहेत. वाशी आरपीएफ आणि जीआरपीएफ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
मंगळवारी 16 जुलैला सुद्धा कुर्ला (Kurla)-विद्याविहार (Vidyavihar), कुर्ला-शीव (Sion) आणि कुर्ला-टिळकनगर (Tilak Nagar) स्थानकांदरम्यान लोकलवर झालेल्या दगडफेकीमुळे एकाच दिवसात तब्बल पाच प्रवासी जखमी झाले होते.
या दगडफेकीला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेने नवीन उपक्रम सुरु केला आहे. यात मागील पाच महिन्यात प्रकर्षाने समोर येणाऱ्या घटना पाहता, कांजूरमार्ग-विक्रोळी-घाटकोपर आणि घाटकोपर-विक्रोळी परिसरात 16 आरपीएफ कर्मचाऱ्यांची गस्तीसाठी नियुक्ती केली आहे . दगडफेक करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी घाटकोपर-विक्रोळी दरम्यान सीसीटीव्ही देखील उभारण्यात आले असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले. याबाबत स्थानिक टोळ्यांवर रेलेवं पोलिसांना संशय आहे या टोळ्या रेल्वे रुळाच्या लगत असणाऱ्या पुलंचा व झाडाझुडुपांचा आडोसा घेऊन हे विकृत कार्य करत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.