शेतकरी कर्जमाफी: अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या सांगली जिल्ह्यात 39 हजारपेक्षा जास्त शेतकरी अपात्र

2 लाखांवरील कर्जाची थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांचे तसेच इतर अटींचा विचार केला तर या कर्जमाफीचा फायदा घेता न येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे.

Representative Image (Photo Credits: twitter)

ठाकरे सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ राज्यातील अत्यंत कमी शेतकऱ्यांना घेता येणार आहे. विरोधी पक्षाकडून या कर्जमाफी योजनेवर टीका होत आहे. सरकारने घातलेल्या अटींमुळे अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार आहेत. विशेष म्हणजे अर्थमंत्री जयंत पाटील (Finance Minister Jayant Patil) यांच्या सांगली जिल्ह्यात (Sangli District) 39 हजार 991 शेतकरी या कर्जमाफी (Loan Waiver) योजनेचा लाभ घेण्यास अपात्र ठरले आहेत. 2 लाखांवरील कर्जाची थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांचे तसेच इतर अटींचा विचार केला तर या कर्जमाफीचा फायदा घेता न येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेतंर्गत सांगली जिल्ह्यातील 52 हजार 714 शेतकरी 2 लाखापर्यंतच्या पीक कर्जमाफीला पात्र ठरत आहे. या शेतकऱ्यांची थकबाकी 583 कोटी 35 लाख आहे.

या कर्जमाफीमध्ये अल्प पीक कर्ज आणि अल्प पीक कर्जाचे पुनर्गठण असा उल्लेख आहे. त्यामुळे मध्यम तसेच दीर्घ मुदतीच्या कर्जदारांना या योजनेचा काहीही फायदा होणार नाही. सरकारच्या या अटी आणि शर्तींमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. (हेही वाचा - ठाकरे सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीवर राजू शेट्टी यांची नाराजी)

येत्या मार्च 2020 पासून ही शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. आतापर्यंतच्या इतिहासात ही सर्वात मोठी कर्जमाफी आहे, असा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला होता. परंतु, कर्जमाफी योजनेमध्ये असलेल्या अटींमुळे अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार नाही.