Disabled Person (प्रातिनिधिक-संग्रहित-संपादित प्रतिमा)

Mobile Shop on e-Vehicle: राज्यातील दिव्यांग व्यक्तींना (Disabled Person) पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई- व्हेईकल- Mobile Shop on e-Vehicle) मोफत उपलब्ध करून देण्याबाबतच्या योजनेसाठी पात्र दिव्यांगांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज सादर करण्याकरिता नोंदणी पोर्टल 4 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात आले आहे. या योजनेचा लाभ अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा़ असे आवाहन महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी केले आहे.

दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याबाबतची योजना लागू करण्यासंदर्भात 10 जून 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मर्या. यांचे स्तरावरुन सुरु आहे.

या योजनेचा उद्देश दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे. दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे. सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार/कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे हे आहेत. (हेही वाचा: Subsidy For Milk-Producing Farmers: दूध उत्पादकांसाठी खूशखबर! प्रति लिटर मागे मिळणार पाच रुपयांचे अनुदान)

या योजनेचा लाभ राज्यातील गरजू दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी अर्जदार नाव नोंदणी (अर्ज) करण्यासाठी पोर्टल दिनांक 3 डिसेंबर 2023 रोजी प्रक्षेपित करण्यात आले असून दिव्यांग व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यासाठी https://evehicleform.mshfdc.co.in  ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या लिंकद्वारे दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 4 जानेवारी 2024 सकाळी 10 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.