Maharashtra Gram Panchayat Election: महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात दाखल होणार

पुढील दोन दिवस ते पुण्यातच मुक्काम करणार आहेत.

MNS Leader Raj Thackeray (Photo Credits-Twitter)

कोरोना संसर्गाच्या (Coronavirus) प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका (Maharashtra Gram Panchayat Election) जानेवारीत होणार आहेत. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका पूर्ण ताकदीने लढवण्याचे आदेश दिल्यानंतर मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) मोर्चेबांधणीसाठी आज पुण्यात (Pune) दाखल होणार आहेत. तसेच पुढील दोन दिवस ते पुण्यातच मुक्काम करणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मनसे आपली रणनीती निश्चित केली करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. मनसेकडून पुण्यातील सर्व ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार उभे केले जाणार आहेत. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून तालुका पातळीवर मनसे नेत्यांच्या आढावा बैठका सुरु आहेत.

या निवडणुकीसाठी येत्या 23 डिसेंबरपासून उमदेवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्षांना आपल्या भागातील ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेचा उमेदवार उभा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निवडणुका पूर्ण ताकदीने लढवण्याच्या सूचनाही राज ठाकरे यांनी दिल्या आहेत, अशी माहिती समोर येत आहे. मनसेही या निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याने ग्रामपंचायतीची निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे देखील वाचा- मुंबई मेट्रो कार शेड BKC मध्ये करण्याचा सल्ला देणारे सरकार आणि महाराष्ट्राला बुडवतील: देवेंद्र फडणवीस

एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते. परंतु, संपूर्ण देशात उद्ववलेल्या कोरोना महामारीमुळे 17 मार्च 2020 रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. दरम्यान, राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान तर, 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे.