MNS Leader Vasant More: मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी, पुण्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ

या प्रकरणात वसंत मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रारी दिली आहे.

Vasant More | (Photo Credits: Facebook)

पुणे येथील बहुचर्चीत मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांचा मुलगा रुपेश मोरे (Rupesh More) याला कधीतरित्या धमकी मिळाल्याचे वृत्त आहे. या प्रकरणात वसंत मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रारी दिली आहे. वसंत मोरे यांच्या मुलाने म्हणजेच रुपेश याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. हा कार्यक्रमासाठी आल्यावर रुपेश याने आपले चारचाकी वाहान एका शाळेच्या आवारात लावले होते. याच वेळी अज्ञात व्यक्तीने या वाहनाच्या वायपरला एक चठ्ठी लावली होती. या चिठ्ठीत 'सावध राहा रुपेश' असा मजकूर होता.

धमकीची चिठ्ठी मिळताच वसंत मोरे यांनी तातडीने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दिली. पोलिसांनीही प्राप्त तक्रारीवरुन लगेच अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वसंत मोरे हे नेहमीच पुण्यात चर्चेत असतात. अनेकदा त्यांनी घेतलेली खळ्ळ-खट्याकची भूमिका चर्चेत असते. अलिकडे तर त्यांनी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या मशिदींवरील भूमिकेलाच विरोध केला होता. त्यामुळे ते चर्चेत होते. (हेही वाचा, PMPML बस मध्ये मध्यरात्री एकट्या पडलेल्या महिलेसाठी मनसेचे वसंत मोरे झाले दीर; बसच्या चालक, वाहकाचंही सोशल मीडीयात कौतुक! पहा नेमकं घडलं काय?)

धमकीचे पत्र मिळाल्यावर वसंत मोरे यांनी प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया दिली. या प्रतिक्रियेत त्यांनी म्हटले आहे की, प्रत्येक बापाला आपल्या मुलाचा अभिमानच असतो आणि बापही मुलाचा आयडॉलच असतो. त्यामुळे आमच्याकडेही तसेच आहे. पण नेमके हेच कोणाला तरी खटकत असावे. ते कोणाला खटकतंय हे समजत नाही, असं मोरे यांनी सांगितले.

पुढे बोलताना राजकारणात अनेकदा नकळत वाद होतात. शत्रूही वाढत असतात. अशा वेळी नेमका शत्रू कोण हे देखील समजत नाही. रुपेश तसा कोणाच्या अध्यात मध्यात नसतो. पण तरीही असे घडले. हे नेमके का घडले हा प्रश्नच मनाला चटका लावून जातो आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण रात्रंदिवस काम करायचे. विचार करायचा असे असताना देखील कोणीतरी आपल्याच कुटुंबाबद्दल असला काही विचार करवा, हे मनाला पटतच नाही असेही मोरे म्हणाले.