Sandeep Deshpande on Thackeray Government: अचानक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह कसे येतात? ठाकरे सरकारला विधीमंडळाचं अधिवेशन चालवायचं नाही म्हणून कोरोना आकडे वाढवून सांगण्यात येतायेत - संदीप देशपांडे

संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून वाढत्या कोरोना आकडेवारीला आणि ठाकरे सरकारमधील मंत्र्याना एकाचवेळी झालेल्या कोरोना संसर्गाला सरकारचा नियोजनबद्ध कार्यक्रम असं म्हटलं आहे.

Sandeep Deshpande (Photo Credits: Facebook)

Sandeep Deshpande on Government: महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीवरून विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. अचानक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह कसे येतात? ठाकरे सरकारला विधीमंडळाचं अधिवेशन चालवायचं नाही म्हणून कोरोना आकडे वाढवून सांगण्यात येत आहेत, अशी घणाघातील टीका मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केली आहे.

संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून वाढत्या कोरोना आकडेवारीला आणि ठाकरे सरकारमधील मंत्र्याना एकाचवेळी झालेल्या कोरोना संसर्गाला सरकारचा नियोजनबद्ध कार्यक्रम असं म्हटलं आहे. संदीप देशपांडे यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, 'सावधान सध्या करोनाचा नवीन स्ट्रेन आला आहे. त्याच नाव विधिमंडळ अधिवेशन करोना असं आहे. जो शरीरावर कमी, पण स्वातंत्र्यावर अधिक परिणाम करतो. टीप-ह्या नंतर अनेक मा वि आ समर्थक मला ट्रोल करतील पण जे सत्य आहे ते बोलणारचं, असंही देशपांडे यांनी म्हटलं आहे. (वाचा - Shiv Sena on Fuel Rate in India: हेच का 'अच्छे दिन'? वाढत्या इंधन दरावरुन शिवसेनेने झळकावले पोस्टर, केंद्र सरकारवर निशाणा)

यासंदर्भात टीव्ही 9 मराठीशी बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, 'अधिवेशनात सरकारला प्रश्नांची उत्तरं द्यायची नाहीत. विधानसभा अध्यक्ष निवडणूक लांबणीवर टाकायची आहे, म्हणून कोरोनाची भीती दाखवली जात आहे. मुख्यमंत्री साहेबाना घरी थांबायचं आहे, म्हणून कोरोनाचे आकडे वाढून सांगता का? तुम्हाला घरी बसायचं आहे तर बसा पण लोकांना लॉकडाऊनची भीती दाखवू नका,' असा उपदेशदेखील संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्याचं मुख्यमंत्र्यांना काही वाटत नाही का? ग्रामपंचायत निवडणुका, शिवसेना-काँग्रेसची आंदोलने झाली, तेव्हा कोरोना नव्हता का? असा सवालही संदीप देशपांडे यांनी महाविकास आघाडी सरकारला केला आहे.