माझं तोंड आणि सहकाऱ्यांचे हात याच कॉम्बिनेशनवरती सगळा पक्ष असतो- राज ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणाचा भविष्यवेध घेण्याच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’कडून आयोजित ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या दूर-संवादमालिकेत ते बोलत होते.

MNS President Raj Thackeray | (File Image)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी दैनिक लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत विरोधकांसह केंद्र सरकारवर सडकून टिका केली आहे. त्याचबरोबर आपला पक्ष आणि आपल्या पक्षाची या पुढील रणनीती यावर भाष्य केले. "मनसे आहे म्हणून राज ठाकरे आहे. माझं तोंड आणि सहकाऱ्यांचे हात याच कॉम्बिनेशनवरती सगळा पक्ष असतो" असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा भविष्यवेध घेण्याच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’कडून आयोजित ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या दूर-संवादमालिकेत ते बोलत होते.

राज ठाकरे आणि मनसे याची तुलना केल्यास विसंवादी दिसते असं विचारण्यात आलं असता राज ठाकरेंनी सांगितलं की, “मनसे आहे म्हणून राज ठाकरे आहे. माझं तोंड आणि सहकाऱ्यांचे हात याच कॉम्बिनेशनवरती सगळा पक्ष असतो. कदाचित कडवट बोलण्यामुळे मी लक्षात राहत असेन आणि माझे सहकारी यांच्या हातवाऱ्यांमुळे लक्षात राहत असतील. पण शेवटी पक्ष म्हणूनच नेता ओळखला जातो. मी व्याख्यान देणारा कोणी आहे म्हणून लोक ओळखतात असं नाही. एका राजकीय पक्षाचा नेता म्हणूनच माझ्याकडे पाहिलं जातं. माझे सहकारी, माझा महाराष्ट्र सैनिक त्यांच्यामुळेच माझी ओळख आहे”.हेदेखील वाचा- सात वर्षात निव्वळ स्वप्ने दाखवली, पण त्यातील एकही पूर्ण केले नाही, नवाब मलिकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

“अनेकांना राजकीय पक्षांचा इतिहासच माहिती नसतो. कित्येक लोक अनेकांना माहिती नव्हती, सत्तेत आल्यानंतर ती कळू लागली. आज माझ्या पक्षाला 15 वर्ष झाली आहेत, तिथे 50, 60 वर्ष झालेल्या पक्षातील लोकांना ओळखत नाही, माझं काय घेऊन बसलात" असेही ते पुढे म्हणाले.

“2009 ते 2012 पर्यंत मनसेच दिसत होती. 2014 मध्ये मोदी लाट आल्यानंतर सगळेच राजकीय पक्षांना चापट्या बसल्या, तशा मलाही बसल्या. माझ्या 15 वर्षाच्या पक्षाचं काय घेऊन बसलात, ज्या एका पक्षाने देशात 65 वर्ष सत्ता गाजवली त्या काँग्रेसची परिस्थिती बघा. मी कोणासोबत तुलना करत नाही, पण या सर्व गोष्टीला एक प्रक्रिया असते आणि त्यातूनच जावं लागतं,” असं राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं.