MNS: 'पुण्यात फिरणे मुश्किल करू' प्रवीण गायकवाड यांच्या फेसबूक पोस्टवर मनसेची संतप्त प्रतिक्रिया

प्रवीण गायकवाड यांच्या टिकेनंतर मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

RajThackeray (Photo Credits: File Photo)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना पुरंदरेंच्या पलिकडे इतिहासाचे आकलन नाही, अशी टीका संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Pravin Gaikwad) यांनी केली आहे. प्रवीण गायकवाड यांच्या टिकेनंतर मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, "लायकीत राहायचे! नाहीतर पुण्यात फिरणे मुश्किल करू" अशी धमकी त्यांनी प्रवीण गायकवाड यांना दिली आहे. वसंत मोरे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे.

"2019 च्या लोकसभेला पुण्यातून इच्छुक असणारा तू...मी स्वतः पाहिलाय तुला गल्लो गल्ली फिरत सांगत होतास की, मी प्रवीण गायकवाड ,मी प्रवीण गायकवाड... तुला राज ठाकरे काय कळणार...लायकीत राहायचे नाहीतर, पुण्यात फिरणे मुश्किल करू...", अशी वंसत मोरे यांनी फेसबूकवर पोस्ट केली आहे. हे देखील वाचा- Sharad Pawar On 102 Constitutional Amendment Bill 2021: केंद्र सरकारने केलेली घटनादुरूस्ती OBC समाजाची फसवणूक; जातिनिहाय जनगणना, 50% आरक्षणाची अट काढण्याची मागणी

वसंत मोरे यांची फेसबूक पोस्ट-

प्रवीण गायकवाड काय म्हणाले?

"राज ठाकरेंना जसे पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही, तसेच त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचेही आकलन नाही. राजकारणात कुठलेही नवनिर्माण करता न आलेला आणि राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला हा माणूस आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा हा सगळा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करत दिसत आहे, अशी टीका प्रवीण गायकवाड यांनी केली आहे. हा संघर्ष उभा करत असताना त्यांना 1899 ते 1999 या शंभर वर्षाच्या काळात महाराष्ट्रात झालेल्या सांस्कृतिक संघर्षाचा आणि आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या वारशाचा राज ठाकरे यांना विसर पडला आहे, हे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. त्यांची सध्याची जी काही मांडणी आहे, ती प्रबोधनकार ठाकरेंच्या ब्राह्मणेतर विचारांपासून फारकत घेणारी आणि पुरंदरेंच्या ब्राह्मणी वर्चस्वाच्या विचारणसरणीला जवळ करणारी आहे हे मात्र नक्की", अशी प्रवीण गायकवाड यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

प्रवीण गायकवाड यांच्या फेसबूक पोस्टनंतर मनसे नेते आक्रमक झाले आहेत. वसंत मोरे यांच्या पोस्टवर प्रवीण गायकवाड काय प्रतिक्रिया देतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.