Bacchu Kadu: आमदार बच्चू कडू यांचा भलताच प्रहार; स्थानिक नागरिकाला कानाखाली लगावली, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
आताही सोशल मीडियावर त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. आपल्या खास स्टाईलसाठी ते प्रसिद्ध असले तरी, कधी कधी भलतेच वर्तन करुन बसतात. त्यामुळे त्यांच्या कामापेक्षा वर्तनाचीच अधिक चर्चा होते. सोशल मीडियावर (Social Media) नुकताच एक व्हिडिओ व्हायरल (Bacchu Kadu Viral Video) झाला आहे
प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. आताही सोशल मीडियावर त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. आपल्या खास स्टाईलसाठी ते प्रसिद्ध असले तरी, कधी कधी भलतेच वर्तन करुन बसतात. त्यामुळे त्यांच्या कामापेक्षा वर्तनाचीच अधिक चर्चा होते. सोशल मीडियावर (Social Media) नुकताच एक व्हिडिओ व्हायरल (Bacchu Kadu Viral Video) झाला आहे. या व्हिडिओमध्ये बच्चू कडू एका व्यक्तीला कानाखाली मारताना दिसतात. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. व्हिडिओत बच्चू कडू यांच्या कानाखालीचा प्रहार झेलणारा व्यक्ती त्यांच्याच प्रहार संघटनेचा कार्यकर्ता असल्याची प्राथमिक माहिती आहे.
सोशल मीडियावर केल्या जात असलेल्या दाव्यात ही घटना अमरावती (Amravati) जिल्ह्यातील गणोजा गावातील असल्याचे समजते. या गावात विकासकामाच्या मुद्द्यावरुन काही ग्रामस्थांमध्ये वाद झाला. या वेळी बच्चू कडू यांना संताप अनावर झाला आणि त्यांनी एकाला कानाखाली मारली. या व्हिडिओत ते सदर व्यक्तीला उद्देशून 'ऐकून घे आधी, शांत बस!' असे म्हणतानाही दिसत आहेत. सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या दाव्यावरुन ही व्यक्ती प्रहार संघटनेचाच कार्यकर्ता असल्याचे समजते. टीव्ही नाईनने दिलेल्या वृत्तात हा कार्यकर्ता प्रहार संघटनेचा नाही. तो एक स्थानिक रहिवासी असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितल्याचे म्हटले आहे. (हेही वाचा, Bacchu Kadu: मंत्री बच्चू कडू यांच्यावर 1 कोटी 95 लाख रुपयांच्या अपहाराचा आरोप, गुन्हा दाखल)
आमदार बच्चू कडू हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. कधी ते एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याची खरडपट्टी काढतात. खरडपट्टी काढता काढता ते कधी संतापतात आणि शारीरिक हिंसेवर उतरतात. त्यांनी केलेल्या मारहाणीचा प्रत्यय अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना आला आहे. त्यांच्या या वर्तनाचे अनेकदा त्यांच्या कार्यकर्त्यांना कौतुक वाटते. प्रसारमाध्यमांतून मात्र बच्चू कडू टीकेचे धनी होतात. अलिकडेच त्यांना एका प्रकरणात न्यायालयाने शिक्षाही ठोठावली आहेत. सध्या ते जामीनावर बाहेर आहेत. शेतकरी, अपंग, दिव्यांग आदी नागरिकांच्या मुद्द्यावरुन ते नेहमी आक्रमक दिसत असले तरी, त्यांच्या वर्तनामुळेही ते अनेकदा चर्चेत असतात. त्यामुळे त्यांच्या समर्थकांप्रमाणेच त्यांच्या टीकाकार आणि विरोधकांचीही संख्या अधिक आहे.