Mithi River Desilting Scam: मिठी नदीतील गाळ उपसा घोटाळ्याबाबत मोठा खुलासा; अभिनेता Dino Morea चे नियंत्रण असलेल्या सँटिनो मोरियाच्या कंपनीला लाखो रुपये हस्तांतरित

पोलिसांच्या निष्कर्षांनुसार, पुनिता कदम आणि सॅन्टिनो मोरिया यांनी युबीओ राइडेझ प्रायव्हेट लिमिटेडमध्ये प्रत्येकी 50% भागीदारी केली असली तरी, प्रत्यक्षात अभिनेता डिनो मोरिया याने कंपनीवर ऑपरेशनल नियंत्रण ठेवले होते.

Mithi River Desilting Scam

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) 65 कोटी रुपयांच्या मिठी नदी गाळ काढण्याच्या घोटाळ्याच्या (Mithi River Desilting Scam) सुरू असलेल्या चौकशीत मोठी आर्थिक अनियमितता उघडकीस आणली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपी केतन कदम याच्या सूचनेनुसार कंत्राटदारांनी कदमची पत्नी पुनिता कदम आणि अभिनेता डिनो मोरियाचा भाऊ सँटिनो मोरिया यांच्या संयुक्त मालकीच्या कंपनी युबीओ राइडेझ प्रायव्हेट लिमिटेडच्या UBO Ridez Pvt. Ltd) खात्यात वेगवेगळ्या कालावधीत एकूण 18 लाख रुपये ट्रान्सफर केले.

पोलिसांच्या निष्कर्षांनुसार, पुनिता कदम आणि सॅन्टिनो मोरिया यांनी युबीओ राइडेझ प्रायव्हेट लिमिटेडमध्ये प्रत्येकी 50% भागीदारी केली असली तरी, प्रत्यक्षात अभिनेता डिनो मोरिया याने कंपनीवर ऑपरेशनल नियंत्रण ठेवले होते. पोलिसांना दिलेल्या निवेदनात, सॅन्टिनो मोरियाने पुष्टी केली की, तो फक्त एक नाममात्र संचालक होता आणि डिनो सर्व प्रमुख निर्णय आणि ऑपरेशन्स हाताळत असे.

तपासकर्त्यांनी डिनो मोरियाची सात बँक खाती आणि सॅन्टिनो मोरियाची पाच खाती ओळखली आहेत. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने या सर्व खात्यांचे व्यवहार विवरणपत्रे मिळवली आहेत आणि सध्या त्यांचे विश्लेषण सुरु आहेर. प्राथमिक निष्कर्षांवरून असे दिसून येते की, केतन कदमने या खात्यांमध्ये अनेक वेळा निधी हस्तांतरित केला. या आर्थिक संबंधांची अधिक चौकशी करण्यासाठी फॉरेन्सिक ऑडिट सुरू करण्यात आले आहे आणि आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग ते करण्यासाठी एका तज्ञ एजन्सीची नियुक्ती करण्याच्या प्रक्रियेत आहे.

मीठी नदी ही विहार आणि पवई तलावांपासून सुरू होऊन 17.8 किमी प्रवास करत माहिम खाडीत आणि अरबी समुद्रात मिळते. मुंबईच्या जलनिस्सारणासाठी ही नदी अत्यंत महत्त्वाची आहे. 2005 च्या मुंबईतील महापुरात 1,000 हून अधिक लोकांचा बळी गेला, ज्याचे प्रमुख कारण नदीतील गाळ आणि प्रदूषणामुळे पाण्याचा प्रवाह अडकला होता. यानंतर, बृहन्मुंबई महानगरपालिकेने नदीच्या गाळ काढण्यासाठी अनेक प्रकल्प सुरू केले. मात्र, 2019 ते 2022 दरम्यानच्या गाळ काढण्याच्या कंत्राटांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. (हेही वाचा: Mumbai Waterlogging: पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्यानंतर बीएमसी कडून 4 पंप ऑपरेटर्सना 40 लाखांचा दंड)

या घोटाळ्यात 65.54 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे, ज्यामध्ये कंत्राटदारांनी गाळ काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘सिल्ट पशर’ आणि बहुउद्देशीय पॉन्टून मशिन्सच्या भाड्याचे दर अवास्तव वाढवले. बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी आणि मध्यस्थांनी संगनमताने बनावट करारपत्रे सादर करून गैरप्रकार केले. या प्रकरणात 13 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे, ज्यात बीएमसीचे तीन अधिकारी आणि पाच खासगी कंत्राटदारांचा समावेश आहे. सध्या या प्रकरणात डिनो आणि सँटिनो मोरिया यांची चौकशी सुरु असून, केतन कदम आणि जयेश जोशी या दोन मुख्य मध्यस्थांना अटक केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement