मंत्री Tanaji Sawant यांचे मराठा आरक्षणाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; चौफेर टीकेनंतर अखेर मागितली माफी
या विषयावर बोलताना महाराष्ट्राचे मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील म्हणाले की, मंत्री तानाजी सावंत यांचे वाक्य मोडतोड करून ते प्रसारमाध्यमातून समोर आणले गेले.
महाराष्ट्राचे मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी सोमवारी मराठा समाजाच्या आरक्षणावर आक्षेपार्ह वक्तव्य करून मराठा समाज आणि विरोधी पक्षांची नाराजी ओढवून घेतली. सुप्रीम कोर्टाने गेल्या वर्षी मे महिन्यात मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षण देणारा महाराष्ट्र कायदा असंवैधानिक ठरवला होता आणि 1992 मध्ये ठरवून दिलेली 50 टक्के आरक्षण मर्यादा तोडण्याची कोणतीही असाधारण परिस्थिती नसल्याचे म्हटले होते.
आता एका कार्यक्रमात सावंत म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने (मराठा) आरक्षणाला दोन वर्षे स्थगिती दिल्यानंतर काहीही झाले नाही. आता राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर आरक्षणासाठी खाज सुटली आहे. मला ते हवे आहे आणि माझ्या पुढच्या पिढीलाही ते हवे आहे. जोपर्यंत आम्ही आरक्षण देत नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. शिवसेनेतील शिंदे गटातील सावंत पुढे म्हणाले की, आमचे नेते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आमच्या मागणीनुसार आरक्षणाची हमी देतील. आरक्षण मिळेपर्यंत ते गप्प बसणार नाहीत.
तानाजी सावंत आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने नुकत्याच केलेल्या आंदोलनाचा संदर्भ देत होते. सावंत यांच्या खाज सुटली आहे या वक्तव्यावर मराठा समाजासह राजकीय पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी हे विधान आक्षेपार्ह आणि बेजबाबदार असल्याचे सांगत सावंत यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. या टीकेनंतर सावंत यांनी माफी मागितली आणि मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नसल्याचे सांगितले. (हेही वाचा: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सहाय्यक चंपासिंह थापा यांचा एकनाथ शिंदे गटात प्रवेश)
या विषयावर बोलताना महाराष्ट्राचे मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील म्हणाले की, मंत्री तानाजी सावंत यांचे वाक्य मोडतोड करून ते प्रसारमाध्यमातून समोर आणले गेले. त्यांना म्हणायचे होते की, देवेंद्र फडणवीसांमुळेच स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मराठा समाजाला आरक्षण मिळाले होते. मात्र, तत्कालीन महाविकास आघाडी सरकार या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात हरले. अशा वेळी अडीच वर्षात आंदोलने का केली नाहीत, आम्ही तुमच्याबरोबर आंदोलन केले असते.