MHADA Pune Lottery 2026 Registration: म्हाडा पुणे लॉटरी नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी; अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर गृहनिर्माण सोडतीसाठी नोंदणी करण्यापूर्वी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची सविस्तर यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. आधार कार्डापासून जात प्रमाणपत्रापर्यंत कोणती कागदपत्रे तयार ठेवावी लागतील, याबाबतची संपूर्ण माहिती.

Pune MHADA Lottery 2026

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (MHADA) आपल्या अधिकृत संकेतस्थळावर पुणे विभागासाठी घरंची सोडत जाहीर केली आहे. 4,462 घरांसाठी लॉटरी अर्ज प्रक्रिया २४ ऑगस्टपासून सुरू झाली आहे.  पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळासह राज्यातील सर्व म्हाडा मंडळांच्या सोडतींसाठी ऑनलाइन नोंदणी करताना कोणती कागदपत्रे अनिवार्य आहे त्याची  माहिती म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर  स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी अर्ज भरताना अनेक अर्जदारांना कागदपत्रांअभावी अडचणींचा सामना करावा लागत होता, त्यामुळे नोंदणी सुरू करण्यापूर्वीच संपूर्ण तयारी करण्याचे आवाहन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.

नोंदणीसाठी आवश्यक मूलभूत कागदपत्रे

म्हाडाच्या संकेतस्थळानुसार, नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी अर्जदाराकडे आधार कार्डाशी संलग्न मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे, कारण ओटीपी पडताळणीसाठी हाच क्रमांक वापरला जातो. याशिवाय वैध ईमेल आयडी, आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही तीन कागदपत्रे प्रत्येक अर्जदारासाठी अनिवार्य आहेत.

विवाहित अर्जदारांच्या बाबतीत, त्यांच्या जोडीदाराचे आधार कार्ड आणि पॅन कार्डदेखील सादर करणे बंधनकारक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. नक्की वाचा: MHADA Pune Lottery 2026: 11 लाखांपासून पुण्यात 4,462 घरांसाठी लॉटरी जाहीर; कोण करू शकते अर्ज? 

उत्पन्न आणि अधिवास संबंधित कागदपत्रे

अर्जदाराला महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचे सिद्ध करण्यासाठी अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाइल सर्टिफिकेट) सादर करावे लागते. याशिवाय अर्जदाराचे स्वतःचे आयकर विवरणपत्र (आयटीआर) आणि विवाहित असल्यास जोडीदाराचेही आयटीआर सादर करणे आवश्यक आहे.

ज्या अर्जदारांकडे आयटीआर उपलब्ध नाही, त्यांच्यासाठी तहसीलदार यांच्याकडून प्राप्त उत्पन्नाचा दाखला हा पर्यायी कागदपत्र म्हणून स्वीकारला जातो.

आरक्षण आणि विशेष प्रवर्गासाठीची कागदपत्रे

राखीव प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांना जात आरक्षण किंवा जात प्रमाणपत्राशी संबंधित आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. याशिवाय विशेष प्रवर्गातील (दिव्यांग, माजी सैनिक, पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक इत्यादी) अर्जदारांसाठीही स्वतंत्र पूर्वअटींची यादी संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

विधवा अर्जदारांसाठीदेखील स्वतंत्र कागदपत्रांची तरतूद करण्यात आली असून, याबाबतची सविस्तर माहिती संकेतस्थळावरील संबंधित विभागात उपलब्ध आहे.

अर्जदारांसाठी मार्गदर्शक व्हिडिओंची सुविधा

नोंदणी प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी म्हाडाने आपल्या संकेतस्थळावर मदत व्हिडिओंची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. https://housing.mhada.gov.in/ वर ही सविस्तर माहिती उपलब्ध आहे. यामध्ये नव्या प्रक्रिया प्रणालीचे फायदे, शुल्क भरण्याची प्रक्रिया, विशेष आरक्षित प्रवर्गासाठी आवश्यक प्रमाणपत्रे, स्वीकृती व समर्पण पत्र तसेच आधार कार्डाच्या आधारे नोंदणी करण्याची पद्धत, अशा विविध विषयांवरील व्हिडिओ उपलब्ध आहेत.

अर्जदारांसाठी महत्त्वाची सूचना

म्हाडाने स्पष्ट केले आहे की, वरील सर्व कागदपत्रे स्कॅन स्वरूपात तयार ठेवूनच नोंदणी प्रक्रिया सुरू करावी, जेणेकरून अर्ज भरताना कोणताही अडथळा येणार नाही. अपूर्ण किंवा चुकीच्या कागदपत्रांमुळे अर्ज नाकारला जाण्याची शक्यता असल्याने, अर्जदारांनी नोंदणीपूर्वी आपली कागदपत्रे काळजीपूर्वक तपासून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी अर्जदार म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement