Marathwada Water Project: कृष्णा खोऱ्यातील नद्यांचे पाणी मराठवाड्यात आणले जाणार; यावर्षी सुरु होऊ शकतो प्रकल्प- Devendra Fadnavis

त्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांमधून समुद्राला वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात आणले जाणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Photo Credits PTI)

कृष्णा खोऱ्यातील पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून मराठवाड्यात आणले जाणार आहे. यासाठीच्या तांत्रिक बाबींची पूर्तता करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून २०२३ मध्येच या कामाला सुरुवात करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. निलंगा (जि. लातूर) येथे राज्याचे माजी मुख्यमंत्री कर्मवीर डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मारकाच्या अनावरणप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी सतत समाजाच्या भल्याचा विचार केला. मराठवाड्याच्या विकासासाठी ते आग्रही होते. जिल्ह्यातील लोअर तेरणा, मांजरा प्रकल्पासह राज्यात अनेक सिंचन प्रकल्प आकारास येण्यामध्ये त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. औरंगाबाद येथे उच्च न्यायालायचे खंडपीठ होण्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत यशस्वी लढा दिला. त्यामुळे आज मराठवाड्यातील लोकांना जलद न्याय मिळण्यास मदत होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करताना डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी सर्वसामान्य लोकांच्या विकासासाठी योजना आखल्या. चाळीस कलमी कार्यक्रम राबवून मराठवाडा, विदर्भ आणि कोकणच्या विकासाला गती दिली. यासारखे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेवून राज्याच्या विकासासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

मराठवाड्याचा विकास हे त्यांचे स्वप्न होते. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मराठवड्यात सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांमधून समुद्राला वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात आणले जाणार आहे. त्याशिवाय मराठवाड्याचा दुष्काळ दूर होणार नाही आणि पर्यायाने महाराष्ट्राचा विकास पूर्ण होणार नाही. त्यामुळे डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे मराठवाड्याच्या विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. (हेही वाचा: कोपरी रेल्वे ओलांडणी पुलाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन; मुंबई आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवरील प्रवाशांची होणार वाहतूक कोंडीतून सुटका)

लातूर येथे रेल्वे बोगी निर्मितीचा कारखाना मंजूर झाल्यानंतर डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी आनंद व्यक्त केला होता. या बोगी निर्मिती कारखान्यात लवकरच ‘वंदे भारत’रेल्वेच्या बोगींची र्निमिती सुरु होणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. सध्या मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष सुरु असून डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनीही या लढ्यात सहभाग घेतला होता. या अनुषंगाने त्यांच्या जीवनातील एक प्रसंग उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितला.