Maratha Reservation: मराठा आरक्षण प्रकरणी आज अपेक्षित न्याय न मिळाल्यास पाणीही न घेत आंदोलन तीव्र करण्याचा मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

अशी आशा मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे पाटील यांनी बोलून दाखवली आहे.

Aarakshan । File Image

जालना मध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन करणार्‍या मराठा समाजाच्या बांधवांवर लाठीहल्ला, गोळीबार झाल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर पसरले आहेत. जालन्यातील (Jalna) अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीकरिता उपोषण सुरू असून आहे. आज या उपोषणाचा सातवा दिवस आहे. मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्त्वाखाली हे उपोषण सुरू आहे. मनोज जरांगे यांनी आज (4 सप्टेंबर) या प्रश्नी न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. सरकार कडून सकारात्मक पाऊलं उचलली गेली नाही तर मात्र त्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

मनोज जरांगे यांची डॉक्टरांनी आज तपासणी केली आहे. आपण डॉक्टर आणि सरकारला प्रतिसाद देणार आहोत पण अपेक्षित न्याय न मिळाल्यास आज सातव्या दिवसानंतर पाणी देखील पिणं बंद केले जाईल असे ते म्हणाले आहेत.

दरम्यान 'सरकारने आम्हांला मुंबईला बोलणीसाठी बोलावलं आहे पण तेथे जाण्याची आम्हाला गरज वाटत नाही. सरकारकडून गिरीश महाजन शिष्टमंडळ घेऊन आले होते तेव्हा त्यांच्याकडून आम्ही सरकारपर्यंत सार्‍या मागण्या पोहचवल्या आहेत. सरकार कडूनही 2 दिवसात निर्णय घेतला जाईल' असं सांगण्यात आल्याचे मनोज जरांगे म्हणाले आहेत. सरकारच्या स्तरावर बैठका सुरू आहेत आणि आज काही निर्णय होण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे यांनी देखील आज जालना मध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यासह उपोषणाला बसलेल्यांची भेट घेतली आहे. या प्रश्नी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलू. सध्या हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. पण काही तोडगा शक्य असेल तर तो काढला जाईल पण यामध्ये जीवाची बाजी लावू नका असं भावनिक आवाहन करत त्यांनी आपण खोटी आश्वासनं देणार नसल्याचंही ते म्हणाले आहेत.