Maratha Reservation: गावबंदी मोडली? खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या ताफ्यातील वाहनांची तोडफोड

गावबंदी असतानाही प्रताप पाटील चिखलीकर यांनी गावात प्रवेश केल्याने त्यांच्या ताफ्यातील वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे.

Pratap Patil Chikhalikar | (Photo Credit: Facebook)

मराठा आरक्षण (Maratha Reservation) मुद्द्यावरुन सुरु असलेल्या आंदोलनाचे लोन राज्यभर पसरत आहे. एका बाजूला मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सुरु केलेले उपोषण आणि या आंदोलानाला पाठींबा म्हणून विविध गावांनी राजकीय नेत्यांना केलेले गावबंदी ठराव हळूहळू तीव्र होत आहेत. गावकऱ्यांनी केलेल्या गावबंदीचा पहिला फटका भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhalikar) यांना बसल्याचे वृत्त आहे. गावबंदी असतानाही प्रताप पाटील चिखलीकर यांनी गावात प्रवेश केल्याने त्यांच्या ताफ्यातील वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. प्राप्त माहतीनुसार ही घटना नांदेड (Nanded) जिल्ह्यातील कंधार (Kandhar Taluka) तालुक्यात असलेल्या अंबुलगा गावात रात्री उशीरा घडली.

खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या ताफ्यातील वाहनांची तोडफोड झाल्याची घटना घडली असली तरी यात कोणालाही इजा झाली नाही, असे प्राथमिक वृत्त आहे. एबीपी माझा आणि इतर मराठी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, गावकऱ्यांनी राजकीय नेत्यांना गावबंदी केली असताना खासदारांनी गावात प्रवेश केला. त्यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी तोडफोड केल्याचे समजते. दरम्यान, गावात निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी पोलिसांनी लागलीच हालचाल केली. परिणामी अनुचित प्रकार टळला. मात्र, झालेल्या तोडफोडीत वाहनांचे बरेच नुकसान झाले.

सकल मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक आहे. आरक्षण आमच्या हक्काचे आहे आणि ते आम्हाला मिळावे, अशी मागणी मराठा समाज पाठीमागील अनेक वर्षांपासून करत आहे. मात्र, अलिकडील काही वर्षांमध्ये त्याला अधिक बळ मिळाले आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या उपोषणामुळे हे आंदोलन अधिक तीव्र झाले असून ते निर्णायक वळणावर येऊन ठेपले आहे. राज्य सरकार आरक्षणाच्या मुद्द्यावर कायदेशीर बाजू तपासत आहे. दुसऱ्या बाजूला मराठा समाजाचा संयम अंतिम टोकावर पोहोचला आहे. अशा स्थितीत अनेक गावकऱ्यांनी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वत: मनोज जरांगे यांनीही गावकऱ्यांना अवाहन केले आहे की, आरक्षण मिळत नाही तोवर राजकीय नेत्यांना गावबंदी करा.

मनोज जरांगे यांच्या अवाहनाला पाठिंबा देत गावकऱ्यांनी राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहीत पवार यांनी सुरु केलेल्या युवा संघर्ष यात्रेलाही अनेक गावात जाण्यापासून मज्जाव करण्यात आला. खास करुन रोहीत पवार यांनीही गावकऱ्यांच्या ठरावाचा मान राखत गावच्या वेशीवर थांबण्याचा निर्णय घेतला. तसेच, या मुद्द्यावर जरांगे यांना पाठींबा देण्याासाठी एक दिवस अन्नत्याग करण्याचाही त्यांनी निर्णय घेतला. दरम्यान, गावबंदीचे हे लोन असेच वाढत गेले तर राजकीय नेत्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, बारामतील येथील एका साखर कारखान्याच्या मोळीपूजनास उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलावू नका, असे अवानहन मराठा क्रांती मोर्चाने केले आहे.