Maratha Aarakshan: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हिंगोलीत एका तरूणाची गळफास घेत आत्महत्या
नवनाथच्या खिशात चिठ्ठी आढळली. त्यामध्ये मी मराठा आरक्षणामुळे जीव देत आहे अशी माहिती लिहिलेली असल्याचे समोर आले आहे.
जालन्यात (Jalana) मराठा आरक्षणाच्या (Maratha Aarakshan) मागणीसाठी पुन्हा मनोज जरांगे पाटील यांनी सरकार विरूद्ध एल्गार केला आहे. यापूर्वी 17 दिवसांच्या उपोषणानंतर सरकारला 40 दिवसांची मुदत आरक्षण देण्यासाठी दिली होती. पण आता ही मुदत संपल्यानंतर पुन्हा राज्यभर मराठा समाज एकवटला आहे. आरक्षणासाठी काही गावात नेत्यांना बंदी घातली जात आहे. जरांगेच्या समर्थनार्थ साखळी उपोषण सुरू झालं आहे. पण जरांगेंनी आरक्षणाची मागणी करताना आत्महत्या न करण्याचं आवाहन करूनही हिंगोलीत एका तरूणाने आत्महत्या करत जीवन संपवलं आहे.
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर शेवाळा शिवारातील ही घटना आहे. मराठा समाजातील युवकाने चिठ्ठी लिहून झाडाला गळफास लावत जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. नवनाथ उर्फ कृष्णा यशवंतराव कल्याणकर असं या मुलाचं नाव असून तो 23 वर्षीय आहे. " मी मराठा आरक्षणामुळे जीव देत आहे" अशी चिठ्ठी सापडली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, नवनाथ हा देवजणा मध्ये राहत होता. शेतामध्ये काम करत होता. सोयाबीण कापणीचं काम करत असताना शेतशिवारात मळणी यंत्र सुरू ठेवतच त्याने एकाएकी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. मळणी यंत्रामध्ये जास्त प्रमाणात सोयाबीनचा घास अडकल्याने ट्रॅक्टर बंद पडत होते तेव्हा मजूरांनी त्यांना आवाज दिला. मात्र आवाज दिल्यानंतरही नवनाथ कल्याणकर आढळून येत नसल्याने मजूरांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. नवनाथचा शोध घेतला असता एका झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला.
बाळापूर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार उपनिरीक्षक शिवाजी बोंडले यांनी पोलिस पथकासोबत घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची तपासणी करताना नवनाथच्या खिशात चिठ्ठी आढळली. त्यामध्ये मी मराठा आरक्षणामुळे जीव देत आहे अशी माहिती लिहिलेली असल्याचे समोर आले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Oct 26, 2023 04:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

