Maratha Aarakshan: मराठा आरक्षण प्रश्नी हेमंत गोडसे ते रमेश बोरनारे पहा कोणकोणत्या आमदार, खासदारांनी दिला राजीनामा!
मराठा समाजाच्या आंदोलकांनी शांतता आणि संयम ठेवण्याचं आवाहन बाजूला सारत राज्यात प्रकाश सोळंके आणि संदीप क्षीरसागर यांच्या घरावर दगडफेक करत गाड्यांचेही नुकसान केले आहे.
महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या (Maratha Aarakshan) मागणीसाठी हा समाज आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यात मराठा समाजाचं आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. यामध्ये काही ठिकाणी जाळपोळीच्या, आंदोलनाला हिंसक वळण लागल्याच्या घटना देखील समोर आल्या आहे. सरकारी पातळीवर काही मोठी पावलं उचलली जाण्याची तयारी सुरू असताना काही आमदार, खासदारांनी आपला राजीनामा मराठा आरक्षणासाठी दिला आहे. आमदारांच्या राजीनाम्यावर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी आमदारांनी राजीनामा देण्यापेक्षा मुंबई मध्ये ठाण मांडून बसावं असं आवाहन केले आहे.
मराठा समाजाच्या आंदोलकांनी शांतता आणि संयम ठेवण्याचं आवाहन बाजूला सारत राज्यात प्रकाश सोळंके आणि संदीप क्षीरसागर यांच्या घरावर दगडफेक करत गाड्यांचेही नुकसान केले आहे. यावर सुप्रिया सुळेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे.
कोणकोणत्या आमदार-खासदार कडून राजीनामा?
सुरेश वरपूडकर - काँग्रेस आमदार
अतुल बेनके - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
लक्ष्मण पवार - भाजप आमदार
हेमंत गोडसे - शिंदे गट खासदार
हेमंत पाटील - शिंदे गट खासदार
रमेश बोरनारे - शिंदे गट आमदार
शिंदे समर्थक नाशिकचे आमदार सुहास कांदे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजीनाम्याची तयारी दाखवली आहे. तसेच हा प्रश्न सुटेपर्यंत कुठल्याही गावात न जाण्याची आणि विकास कामांचं उद्घाटन न करण्याची प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणासाठी वेळप्रसंगी राजीनामा देईन असं नरहरी झिरवळ देखील म्हणाले आहेत.
दरम्यान राज्यात मराठा समाज आक्रमक होत असल्याचं पाहून आजपासून मनोज जरांगे पाटील पुन्हा पाणी घेण्यास सुरूवात करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.