Cyber Crime: ऑनलाईन शर्ट घेण्याच्या नादात मुंबईत मरीन ड्राईव्ह मधील व्यक्तीला 92 हजारांचा फटका; आरोपी पश्चिम बंगालमधून अटकेत
पोलिसांनीही कारवाई करत फोन नंबर ट्रॅक केला आणि आरोपीचे धागेदोरे पश्चिम बंगाल मध्ये आढळले.
मरीन ड्राईव्ह पोलिसांनी (Marine Drive Police) नुकतेच पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद मधून 2 जणांना अटक केली आहे. ऑनलाईन फ्रॉड (Online Fraud) प्रकरणामध्ये त्यांना ही अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपी हे ऑनलाईन फ्रॉड करणारे आहेत. लोकांना ऑनलाईन शॉपिंग मधून फसवण्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
ऑनलाईन माध्यमातून फसवणूक करताना ते शॉपिंग पोर्टल वर शर्टच्या विक्रीची जाहिरात लावत असे. खरेदी दरम्यान ते युजर्सच्या बॅंकिंग डाटावर डल्ला मारत होते. दक्षिण मुंबईच्या एका व्यक्तीने 92 हजार गमावल्याची तक्रार केल्यानंतर हा प्रकार प्रकाशझोतात आला आहे. हे देखील नक्की वाचा: Mumbai Cyber Crime: मुंबईत वृ्द्ध व्यक्तीची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या एका तरुणाला खार पोलिसांकडून अटक .
टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, तक्रारदारने 949 रूपयांचा शर्ट मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात ऑर्डर केला होता. त्याला शर्ट मिळाला नाही. महिन्याभराने त्याने वेबसाईटच्या कस्टमर केअर सोबत संपर्क साधला. त्याने राजकुमार नावाच्या व्यक्तीसोबत बोलणं केलं होतं. रिफंड मिळवण्यासाठी त्याला एक लिंक पाठवण्यात आली ज्यामध्ये बॅंकेचे डिटेल्स आणि यूपीआय पिन विचारण्यात आला होता. 6 सप्टेंबरला जेव्हा फॉर्म भरून सादर केला तेव्हा त्याच्या अकाऊंट मधून 43 हजार आणि 49,999 रूपये कापल्याचा त्याला मेसेज मिळाला.
फसवणूक झालेल्या व्यक्तीने मरीन ड्राईव्ह पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली. पोलिसांनीही कारवाई करत फोन नंबर ट्रॅक केला आणि आरोपीचे धागेदोरे पश्चिम बंगाल मध्ये आढळले. मार्च 3 दिवशी पोलिसांनी पश्चिम बंगालमधून Tofajul Tahir Shaikh ( वय 31) आणि Rabbiul Mandal (वय 25) यांना अटक केली. आय अॅक्ट अंतर्गत फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना अटक झाली आहे.