Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत मोठा घोटाळा उघड; 2,652 सरकारी कर्मचारी महिलांनी घेतला लाभ, 3.58 कोटी वसूल केले जाणार

या घोटाळ्याची पोलखोल 1.20 लाख सरकारी कर्मचाऱ्यांच्या आधार तपासणीतून झाली, जिथे 2,652 कर्मचारी अपात्र आढळले. सरकारने या कर्मचाऱ्यांचे पेमेंट थांबवले असून, वसुली प्रक्रिया सुरू केली आहे.

Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत मोठा घोटाळा उघड; 2,652 सरकारी कर्मचारी महिलांनी घेतला लाभ, 3.58 कोटी वसूल केले जाणार
Indian Money | Representational Image (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’त (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. या योजनेतून 2,652 महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी अपात्र असतानाही लाभ घेतल्याचे समोर आले आहे, आणि त्यांच्याकडून आता 3.58 कोटी रुपये वसूल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही योजना पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये आर्थिक मदत देते, परंतु सरकारी कर्मचारी, ज्यांचे उत्पन्न पात्रता निकषांपेक्षा जास्त आहे, त्यांनी बनावट कागदपत्रे आणि आधार क्रमांकाचा गैरवापर करून लाभ मिळवला. यानंतर आता सरकारने आणखी 6 लाख कर्मचाऱ्यांची तपासणी सुरू केली आहे.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ 2024 मध्ये सुरू झाली, जी 21 ते 65 वयोगटातील महिलांना, ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, दरमहा 1,500 रुपये थेट बँक खात्यात (DBT) देते. या योजनेचा लाभ 2.53 कोटी मराठी महिलांना मिळाला आहे, आणि आतापर्यंत 33,232 कोटी रुपये वितरित झाले आहेत. मात्र, योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सरकारी कर्मचाऱ्यांना हे फायदे मिळण्यास पात्र नाही. या निर्बंधाला न जुमानता 2,652 महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी, ज्यांचे उत्पन्न या निकषांपेक्षा जास्त आहे, बनावट माहिती देऊन योजनेचा लाभ घेतला. या कर्मचाऱ्यांनी आधार क्रमांक आणि बँक खात्यांचा गैरवापर केला, ज्यामुळे त्यांना प्रत्येकी सरासरी 13,500 रुपये मिळाले, ज्याद्वारे सरकारचे एकूण 3.58 कोटी रुपयांचे नुकसान झाले.

या घोटाळ्याची पोलखोल 1.20 लाख सरकारी कर्मचाऱ्यांच्या आधार तपासणीतून झाली, जिथे 2,652 कर्मचारी अपात्र आढळले. सरकारने या कर्मचाऱ्यांचे पेमेंट थांबवले असून, वसुली प्रक्रिया सुरू केली आहे. विशेष म्हणजे, फेब्रुवारी 2025 पासून 7.7 लाख महिलांचे पेमेंट थांबवण्यात आले आहे, कारण त्यांना लाडकी बहिण आणि नमो शेतकरी सन्मान योजनेतून दुहेरी लाभ मिळत होता. महाराष्ट्र सरकारने या घोटाळ्यावर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. 3.58 कोटी रुपये वसूल करण्यासाठी अपात्र कर्मचाऱ्यांना नोटिसा पाठवल्या जात आहेत, आणि त्यांच्या पगारातून किंवा बँक खात्यांमधून ही रक्कम वसूल केली जाईल. (हेही वाचा: Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहिण योजने'साठी इतर विभागांचा निधी वळवल्याचा विरोधकांचा आरोप; CM Devendra Fadnavis यांनी दिले स्पष्टीकरण)

याशिवाय, सरकारने आणखी 6 लाख सरकारी कर्मचाऱ्यांच्या आधार आणि पात्रता तपासणीला सुरुवात केली आहे, जेणेकरून असे गैरप्रकार पुन्हा होऊ नयेत. महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, योजनेच्या नियमांमध्ये कोणताही बदल झालेला नाही, आणि पात्र महिलांना 1,500 रुपये मिळत राहतील. तटकरे यांनी सांगितले की, ज्या 7.7 लाख महिला नमो शेतकरी योजनेतून 1,000 रुपये घेतात, त्यांना लाडकी बहिण योजनेतून फरकाची रक्कम (500 रुपये) मिळते, जेणेकरून एकूण 1,500 रुपये मिळतील.

(The above story first appeared on LatestLY on May 30, 2025 01:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).