Maharashtra Assembly Elections 2024: महाविकास आघाडी लोकांना पर्याय देईल; शरद पवार यांचे आश्वासन

जे काही मुद्दे समोर येतील, ते आम्ही सौहार्दपूर्णपणे सोडवू. जास्त अपेक्षा आणि मागण्या असायला हरकत नाही. लोकसभा निवडणुकीतही अशाच अपेक्षा होत्या, पण आम्ही त्या सोडवल्या, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Sharad Pawar | (Photo Credits: Facebook)

Maharashtra Assembly Elections 2024: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. अशातचं आता महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुती मधील नेत्यांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Elections 2024) महाविकास आघाडी (MVA) एकदिलाने काम करेल आणि महाराष्ट्रातील जनतेला पर्याय देईल, असे राष्ट्रवादीचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटलं आहे. पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले की, शिवसेना (यूबीटी), राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) आणि काँग्रेस या आघाडीत कोणावरही वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न नाही. जे काही मुद्दे समोर येतील, ते आम्ही सौहार्दपूर्णपणे सोडवू. जास्त अपेक्षा आणि मागण्या असायला हरकत नाही. लोकसभा निवडणुकीतही अशाच अपेक्षा होत्या, पण आम्ही त्या सोडवल्या, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार आज शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांच्या निवासस्थानाबाहेर पत्रकारांशी बोलत होते.

दरम्यान, आज जुन्नरचे आमदार आणि सध्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात असलेल्या अतुल बेनके यांनी आज अमोल कोल्हे यांच्या निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी शरद पवार यांनी अतुल बेनके यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या या भेटीने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं. अजित पवार गटाचे आमदार पुन्हा शरद पवार गटात परतत आहेत का? अशी चर्चा सुरू झाली. मात्र, यावर शरद पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी अतुल बेनके यांचे वडील माझे मित्र आहेत. अतुल माझ्या मित्राचा मुलगा आहे. राजकारणाचा निर्णय त्या त्या वेळेस घेऊ, असं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं. (हेही वाचा -Chhagan Bhujbal Meet Sharad Pawar: शरद पवार यांच्यासोबत काय चर्चा झाली? छगन भुजबळ यांनी दिली सविस्तर माहिती)

राष्ट्रवादी काँग्रेसने (एसपी) आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यव्यापी तयारी सुरू केली आहे. महायुती सरकारने सत्तेत येऊनही लोकांचे प्रश्न सोडवले नाहीत. आम्हाला विधानसभा परत घ्यायची आहे, असंही यावेळी शरद पवार यांनी नमूद केलं. याशिवाय, एमव्हीएमधील जागावाटपासंदर्भात बोलताना शरद पवार म्हणाले की, प्रत्येकजण अधिक जागांसाठी विनंती करतो. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या जागा लढवता त्या जिंकणे. राष्ट्रवादीने (एसपी) 10 जागा लढवल्या, पण आठ जागा जिंकल्या. आमच्याकडे सर्वाधिक जागा होत्या. (हेही वाचा, Chhagan Bhujbal Meet Sharad Pawar: छगन भुजबळ सिल्वर ओकवर दाखल, शरद पवार यांच्या अचानक भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ)

दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने एक जागा जिंकली, तर राष्ट्रवादीने चार जागा जिंकल्या. पाच वर्षांनंतर महाराष्ट्रातील जनतेने आमच्या युतीला 31 जागा दिल्या आहेत, असे सांगून त्यांनी एमव्हीएच्या संभाव्यतेबद्दल आशावाद व्यक्त केला. 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षाला 288 पैकी 225 जागा मिळतील, असं पवार यांनी म्हटलं होतं.