Maharashtra Assembly Elections 2019: मतदानावर 'पाणी' पडण्याची शक्यता; राज्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज राज्यात ठिकठिकाणी पावसाची शक्यता असल्या कारणाने मतदानाच्या टक्क्यामध्ये घट होऊ शकते, असे अनुमान लावण्यात येत आहे.
राज्यात आज सर्वत्र विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Elections) मतदानाची गडबड असताना पावसाने मात्र आपला खेळ सुरु ठेवत महाराष्ट्रातील सर्व मतदारांच्या उत्साहावर पाणी पाडण्याचे ठरवले आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज राज्यात ठिकठिकाणी पावसाची शक्यता असल्या कारणाने मतदानाच्या टक्क्यामध्ये घट होऊ शकते, असे अनुमान लावण्यात येत आहे.
अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादळी वाऱ्यासह उत्तर कोकणामध्ये म्हणजेच मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यासोबतच रायगड जिल्ह्याच्या काही भागातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच दाक्षीम कोकण म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यालाही पावसाचा तडाखा बसणार आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कमी असला तरीही तुरळक सरींची शक्यता आहे. (Live Updates महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 Live Updates: राज्यात 95 हजारहून अधिक केंद्रांवर मतदानाला सुरुवात, शिवाजीनगर येथे मेणबत्तीच्या प्रकाशात मतदान)
तसेच उत्तर मध्य महाराष्ट्र म्हणजेच पुणे नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात; आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र म्हणजेच सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर दुसरीकडे औरंगाबाद, उस्मानाबाद, आणि बीड या मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये सरींची शक्यता आहे.
नाशिक, पुणे, सातारा, सांगली या भागात शनिवारपासून सुरु असलेल्या पावसाच्या संततधरेने त्रस्त केले आहे. सांगलीच्या कृष्णा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे आज मतदार मतदानासाठी घरातून बाहेर पडणार का ही भीती आहे. पुण्यासारख्या ठिकाणी जिथे लोकसभेला सर्वात कमी 49% मतदान झालं होतं, तिथे आज मकिती मतदान होते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.