IPL Auction 2025 Live

Vishnu Savara Passed Away: महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचं निधन

प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात उपचार सुरु होते. आज अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

Vishnu Savara Passed Away | (Photo Credits: Twitter)

राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा (Vishnu Savara) यांचं आज (9 डिसेंबर) निधन झालं आहे. प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील (Mumbai) कोकिळाबेन रुग्णालयात (Kokilaben Hospital) उपचार सुरु होते. आज अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते 72 वर्षांचे होते. दरम्यान, उद्या 10 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता वाडा येथील निवासस्थानावरुन त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.

विष्णू सावरा हे 1980 मध्ये भारतीय जनता पक्षात पूर्णवेळ रुजू झाले. त्यांनंतर त्यांना 1980 च्या  विधानसभा निवडणुकीत वाडा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली. त्यात पराभव झाल्याननंतर पुन्हा 1985 मध्ये त्यांनी त्याच मतदार संघातून निवडणूक लढवली. त्यावेळीही त्यांचा पराभव झाला.  या पराभवानंतर खचून न जाता त्यांनी पुन्हा 1990 मध्ये वाडा मतदार संघातून निवडणूक लढवली आणि विजय प्राप्त केला. त्यानंतर 2014 पर्यंतच्या सर्व विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. विशेष म्हणजे पालघर जिल्ह्याचे पहिले पालकमंत्री होण्याचा मानही त्यांनी मिळवला. आदिवासी समाजाच्या विकासासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय होते.

मंत्रीपद हाती असताना त्यांनी तील शंभरहून अधिक आदिवासी शासकीय आश्रमशाळांमध्ये कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण सुरु करण्याचा निर्णय घेतला. आदिवासी भागात प्रत्येक गावाला जोडणा-या रस्त्यांचे डांबरीकरण, पिण्याच्या पाण्याच्या योजना, समाजगृहे अशी अनेक कामे करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. तरुणांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी सावरा यांनी आमदार चषक यांच्यासह विविध क्रीडा स्पर्धा सुरु केल्या. (माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या निधनावर देवेंद्र फडणवीस, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला शोक)

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ज्येष्ठ भाजप नेते विष्णू सावरा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. तसंच त्यांच्या भरीव कारकीर्दीचा उल्लेख करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.