Maharashtra Weather Forecast: फेब्रुवारी महिन्यात राज्यात अनुभवायला मिळणार पावसाळी वातावरण; कोकण, पश्चिम, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता

5 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाळी वातावरण अनुभवायला मिळणार असल्याचा अंदाज आहे.

Rain | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Maharashtra Weather Forecast Update: जानेवारी महिन्यात पाऊस अनुभवल्यानंतर आता फेब्रुवारीतही पाऊस बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 5 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाळी वातावरण अनुभवायला मिळणार असल्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने गुरुवारी वर्तवलेल्या अंदाजानुसार, 22 ते 28 जानेवारी आणि 29 ते 4 फेब्रुवारी या कालावधीत मध्य भारतात कोरडे वातावरण असेल. तर त्याचवेळी उत्तर आणि दक्षिणेकडील भागांत काही प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाळी वातावरण निर्माण होईल. 5 ते 11 फेब्रुवारी या कालावधीत कोकणामध्ये पावसाळी वातावरण अधिक प्रमाणात जाणवेल.

12 ते 18 फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्रात इतर ठिकाणी देखील पावसाळी वातावरण पाहायला मिळेल. अशी प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक के, एस, होसाळीकर यांनी दिली आहे. दरम्यान, याबद्दलची खात्रीशीर माहिती जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात मिळू शकेल, हे देखील त्यांनी स्पष्ट केले. (Maharashtra Weather Updates: उत्तर महाराष्ट्रात,विदर्भात किमान तापमानामध्ये घट; मुंबईकरांची सकाळही गारव्यात; पहा तुमच्या जिल्ह्यातील तापमान)

जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात आणि फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला किमान तापमानाचा पारा खाली उतरल्याने थंड वातावरणाचा अनुभव नागरिकांना घेता येईल. तर 5 फेब्रुवारीपासून पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात 20 जानेवारीपासून पुन्हा येणार थंडीची लाट, नाशिकचा पारा 12 अंशाच्या खाली जाण्याची शक्यता- IMD)

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी धुकं दाटून येत आहे. तर मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातही गारवा वाढला आहे.