Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मनसे विधानसभेच्या 225-250 जागा लढणार - राज ठाकरे यांची घोषणा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे 1 ऑगस्ट पासून राज्याच्या दौर्या वर येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज मुंबई मध्ये पदाधिकारी मेळावा घेत विधानसभा निवडणूकीचं रणशिंग फुंकलं आहे. आगामी विधानसभा निवडणूकीमध्ये (Maharashtra Vidhan Sabha Election) मनसे 225-250 जागा लढवणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यामुळे आघाडी, युती चा विषय डोक्यातून काढा आणि कामाला लागा असं आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 1 ऑगस्ट पासून राज्याच्या दौर्या वर येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
अमेरिकेमध्ये 20-25 दिवस बीएमएम च्या कार्यक्रमानिमित्त गेलेल्या राज ठाकरेंनी देशात परतताच विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने कामाला लागत ही निवडणूक सार्याच पक्षांसाठी 'न भूतो' अशी होणार असल्याचं म्हटलं आहे. पक्षांतून ज्यांना जायचं आहे त्यांच्यासाठी मी स्वतः लाल कार्पेट घालायला येतो असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. यावेळी निवडून येण्याची क्षमता असलेल्यांनाच तिकीट दिलं जाणार असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.
विधानसभा निवडणूकीसाठी मनसे कडून अंतर्गत सर्व्हे करण्यात आला आहे. त्यानुसार पहिल्या अहवालाच्या माहितीनुसार मनसे 250 जागा लढणार आहे. यावेळी काहीही करून आपल्याला सत्तेत बसायचं आहे असा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. नक्की वाचा: Maharashtra Politics: 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूका एकत्र लढण्याबाबत शरद पवार यांनी व्यक्त केली साशंकता; संजय राऊत यांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया (Watch Video).
महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. मागील विधानसभा निवडणूकीमध्ये जनतेने शिवसेना-भाजपाच्या बाजूने कौल दिला होता पण सत्तेत भागीदारीवरून दोन्ही पक्षांची गणितं बिघडली आणि राज्याच्या सत्तेत मोठा गोंधळ बघायला मिळाला. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना पक्षांमध्ये मोठी फूट बघायला मिळाली. मनसेने मागील लोकसभा निवडणूकीमध्ये महायुतीला आपला बिनंशर्त पाठिंबा दिला होता. मात्र विधानसभेला राज ठाकरे स्वबळावर निवडणूकांना सामोरे जाण्याच्या तयारीमध्ये आहेत.
1 ऑगस्ट पासून सुरू राज ठाकरे महाराष्ट्र दौर्यादरम्यान कार्यकर्त्यांच्या, पदाधिकार्यांच्या भेटी घेणार आहेत. या निवडणूकीसाठी सर्व्हे करण्यासाठी येणार्यांना मनसे कार्यकर्त्यांनी प्रामाणिक राहून माहिती द्यावी असं देखील आवाहन केली आहे.