Maharashtra SSC, HSC Result 2020: 10,12वी च्या विद्यार्थ्यांचे पेपर तपासणीचे काम अंतिम टप्प्यात; लवकरच जाहीर होणार निकालाची तारीख

मात्र विद्यार्थ्यांनी त्यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

Results| Photo Credits: Pixabay.com

सध्या महाराष्ट्रासह जगाला कोरोना व्हायरसच्या संकटाने ग्रासलं आहे. या जागतिक आरोग्य संकटाचा परिणाम यंदाच्या शैक्षणिक वर्षावरही पहायला मिळाला आहे. आज जून महिना निम्म्यावर आला असला तरीही अद्याप राज्य शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी आणि मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या निकालाच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. दरम्यान मीडीया रिपोर्ट्सनुसार सध्या 85% उत्तरपत्रिका तपासण्याचं काम पूर्ण झालं आहे. उर्वरित पेपर तपासणीदेखील पूर्ण करून लवकरात लवकर निकाल लावण्याचा शिक्षण मंडळाचा प्रयत्न राहणार आहे. मागील काही दिवसांपासून सोशलमीडीयावर दहावी आणि बारावी निकाल 2020 च्या अनेक तारखांबद्दलचे मेसेज व्हायरल होत आहेत. मात्र विद्यार्थ्यांनी त्यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे. लवकरच शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकालाच्या नेमक्या तारखा स्पष्ट होणार आहेत. Maharashtra Board Exam Results 2020: 10वी 12वी च्या निकालामध्ये यंदा नव्या गुणदान पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी किमान किती टक्के गुण हवेत?

कोरोना व्हायरस संकटात कंटेन्मेंट झोनमधून ये-जा बंद केली जाते. त्यामुळे पेपर तपासणी, निकाल लावण्याची प्रक्रिया यामध्ये अधिक वेळ जात आहे. परंतू येत्या काही दिवसात शिक्षण मंडळाच्या नऊही विभागातून पेपर तपासणीचं काम आणि निकाल लावण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर यंदाचा महाराष्ट्र बोर्डाचा निकाल जाहीर केला जाईल. राज्यात मुंबई विभागात विद्यार्थी संख्या सर्वाधिक आहे. काही दिवसांपूर्वी वर्षा गायकवाड यांनी देखील पुढील महिन्यापर्यंत निकाल लावण्याचे शिक्षण मंडळाचे प्रयत्न असतील असे सांगण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वीपर्यंत 10 जूनला यंदा बोर्डाचा निकाल लागू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र आता हा निकाल लांबणीवर गेला आहे. यंदा महाराष्ट्र राज्यात यंदा 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी दहावीची परीक्षा दिली, तर 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थी बारावीची परीक्षा दिली आहे.