Maharashtra RS Polls 2022: मनसेचा एकमेव आमदार राजू पाटील कुणाला देणार मत? राज ठाकरेंनी केला फैसला
आमदार राजू पाटील भाजपा उमेदवारासाठी मतदान करणार आहेत.
महाराष्ट्रात येत्या 10 जून दिवशी राज्यसभेची निवडणूक पार पडणार आहे सहाव्या जागेसाठी शिवसेना विरूद्ध भाजपा अशी लढत होणार आहे आणि आपलाच उमेदवार जिंकून यावा यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न सुरू आहेत. या निवडणूकीत सहावी जागा निवडून आणण्यासाठी भाजपा आणि महाविकास आघाडी कडून अपक्ष आणि छोट्या पक्षांची मनधरणी सुरू आहे. मनसेचा एकमेव आमदार आपल्या बाजुने मतदान करावा यासाठी भाजपाकडून आशिष शेलार(Ashish Shelar) आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) भेटीला गेले होते. दरम्यान भाजपा आणि मनसेने राज्यसभेच्या निवडणूकीसाठी हातमिळवणी केली आहे.
मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील भाजपाच्या बाजूने मतदान करणार आहेत. आशिष शेलार यांनी राज ठाकरेंसोबत झालेल्या भेटीनंतर मीडीयाशी बोलताना त्याची माहिती दिली आहे. दरम्यान राजू पाटील हे कल्याण ग्रामीणचे आमदार आहेत. त्यांचे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. मात्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत 36 चा आकडा असल्याने राज्यसभेच्या खासदारकीसाठी राजू पाटील कोणाला मत देणार याची उत्सुकता होती पण आज मनसेचा हा एकमेव आमदार भाजपाच्या बाजूने जाणार असल्याचं स्पष्ट झाले आहे. हे देखील नक्की वाचा: Rajya sabha Election 2022: महाराष्ट्रात दोन तपानंतर राजकीय परिस्थितीची पुनरावृत्ती? शरद पवार यांच्या खेळीला उजाळा; जाणून घ्या काय घडलं होतं नेमकं?
मागील काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपा नेते यांच्या गाठीभेटी वाढत होत्या त्यामुळे आगामी निवडणूकांमध्ये हे दोन पक्ष हातमिळवणी करणार याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरूच होती. राज ठाकरे देखील मागील सभांमध्ये महाविकास आघाडीवर टीकेचे बाण सोडताना दिसत आहेत.