Raigad: मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुरात 5 वर्षांच्या मुलीसह 2 जण गेले वाहून
यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले असून यात अनेक जणांचे प्राण गेल्याच्या काही घटनाही समोर येत आहेत.
राज्याला मागील काही दिवसांपासून पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले असून यात अनेक जणांचे प्राण गेल्याच्या काही घटनाही समोर येत आहेत. रायगड (Raigad) जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी पातळीत वाढ झाली आहे आणि यात 5 वर्षांच्या मुलीसह दोघजण वाहून गेले आहेत.
कुंडलिका आणि सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून रोहा आणि महाड मध्ये पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर उल्हास नदीचे पाणी आज सकाळी कर्जत शहारात शिरल्याने नागरिकांची एकच धांदल उडाली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाडमध्ये सावित्री नदीच्या पुरात 50 वर्षीय व्यक्ती वाहून गेली असून कर्जतमध्ये उल्हास नदीच्या पुरात 40 वर्षीय व्यक्ती आणि त्याची मुलगी वाहून गेल्याचे समोर येत आहे.
संजय नरखेडे असे सावित्री नदीत वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांना बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र रुग्णालयात नेताच त्यांना मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, उल्हास नदीत वाहून गेलेल्या बापलेकीचा तपास अद्याप सुरु आहे. इब्राहिम मणियार आणि झोया असे या दोघांची नावे आहेत. (Chiplun Flood: चिपळूण जलमय, रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे रौद्ररुप; घरे, वाहने पाण्यात, नागरिक छतांवर; एनडीआरएफ पथकाद्वारे मदतकार्य सुरु)
किनारी प्रदेशात राहणाऱ्या नागरिकांना रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसंच खोपोलीच्या प्रज्ञानगर आणि सिद्धार्थनगर मधून तब्बल 53 कुटुंबांना त्यांच्या घरातून सुरक्षइत स्थळी हलवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. खालापुरातील जामरुंगा बौद्धवाडी आणि बिधकुर्धा गाव येथील रहिवाशांचे जिल्हा परिषदेचे शाळेत स्थलांतर करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, रायगडमध्ये 165mm पावसाची नोंद झाली आहे. माथेरान आणि मुरुडमध्ये सर्वाधिक म्हणजेच अनुक्रमे 331.40mm आणि 43mm इतक्या पावसाची नोंद झाली आहे.