Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे गटाचा युक्तीवाद पूर्ण, सत्तासंघर्षावर निर्णय कधी? सरन्यायाधीशांनी दिले महत्त्वाचे संकेत; घ्या जाणून
सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्णा मुरारी, न्या. हिमा कोहली आणि न्या. पी. एस. नरसिंहा यांच्या घटनापीठापुढे सुरु असलेल्या या सुनावणीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाकडून सुरु असलेला युक्तीवाद पूर्ण झालाआहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठासमोर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) सुनावणी सुरु आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्णा मुरारी, न्या. हिमा कोहली आणि न्या. पी. एस. नरसिंहा यांच्या घटनापीठापुढे सुरु असलेल्या या सुनावणीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाकडून सुरु असलेला युक्तीवाद पूर्ण झालाआहे. आता शिंदे गटाकडून युक्तीवाद सुरु होणार आहे. दरम्यान, सुनावणीपाठी सुनावणी सुरु आहे. मात्र, सत्तासंघर्षाचा निकाल नेमका कधी लागणार, न्यायालयाचा अंतिम निर्णय केव्हा येणार याबाबत महाराष्ट्रासह देशातील नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. ही उत्सुकता कायम असतानाच सरन्यायाधीशांनी सुनावणीदरम्यान, काही संकेत दिले आहेत. ज्यामुळे या प्रकरणाचा निकाल कधी येऊ शकेल याबाबत अंदाज बांधला जाऊ लागला आहे.
पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी आजपासून पुढील तीन दिवस सलग सुरु राहणार आहे. उद्धव ठाकरे गटाकडून कपील सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी आणि देवतत्त कामत हे अनुभवी वकील बाजू मांडत आहेत. जी मांडून पूर्ण झाली आहे. दुसऱ्या बाजूला शिंदे गटाकडून हरीश साळवी, महेश जेटमलानी, , मनिंदर सिंग आणि सॉलिसीटर जनरल तुषार मेहता हे बाजू मांडत आहेत. ठाकरे गटाकडून कपील सिब्बल यांचा युक्तीवाद पूर्ण झाला आहे. तर उर्वरीत युक्तीवाद आज अभिषेक मनू सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी पूर्ण केला. सिंघवी यांनी प्रामुख्याने राज्यपालांच्या भूमिकेवर युक्तिवाद केला तर, देवदत्त कामत यांनी पक्षप्रतोद निवडीचा मुद्दा यावर युक्तीवाद केला. (हेही वाचा, Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात या आधी काय घडले)
कोर्टाने नेमके संकेत काय दिले?
ठाकरे गटाच्या वकिलांकडून युक्तीवादाला आज सकाळी सुरुवात होतानाच कोर्टाने काहीशा वेळेत युक्तीवाद पूर्ण करण्यास सांगितले. ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तीवाद पूर्ण झाल्यावर कोर्टाने दुपारच्या जेवनासाठी सुटी घेतली. या मधल्या सुटीला जाण्यापूर्वी घटनापीठाचे प्रमुख असलेल्या सरन्यायाधीशांनी म्हटले की, काही करुन आम्हाला हे प्रकरण या आठवड्यातच संपवायचे आहे.
दरम्यान, कोर्टाने या प्रकरणात एक प्रकारे वेळापत्रकच आखून दिल्याचे दिसते. जसे की, सत्तासंघर्षाच्या या प्रकरणात दोन्ही बाजूंकडून 2 ते 4 मार्चपर्यंत युक्तीवाद पूर्ण होतील. ठाकरे गटाचा युक्तीवाद पूर्ण झाल्यामुळे शिंदे गटाकडून युक्तीवाद पूर्ण झाला आहे. तसेच, दोन्ही बाजूचे युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटाकडून पुन्हा एकदा समारोपाचा युक्तीवाद अल्प काळात होऊ शकतो. त्यानंतर थेट निकाल जाहीर केला जाईल. तत्पूर्वी हा निकाल काही वेळासाठी राखून ठेवला जाईल असाही तर्क तज्ज्ञांनी दिला आहे.