Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी 23 ऑगस्टला!

सत्ता संघर्षातील किचकट बाबी लक्षात घेता त्रिसदस्यीय खंडपीठाकडून मोठ्या घटनापीठाकडे हे प्रकरण वर्ग करण्याचा विचार होऊ शकतो.

Eknath Shinde vs Uddhav Thackeray | (Photo Credit: Archived, edited, representative images)

महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे विरूद्ध उद्धव ठाकरे गट आणि राज्याच्या सत्ताकारणाचा संघर्ष सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहचला आहे. आज या प्रकरणामध्ये होणारी सुनावणी आता 23 ऑगस्टला होणार आहे. शिवसेनेकडून 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई केल्याने न्यायालयात पोहचलेल्या शिंदे गटाने आम्हीच खरी शिवसेना असं म्हणत उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे. त्रिसदस्यीय खंडपीठामधील एक न्यायमूर्ती उपलब्ध नसल्यामुळे ही सुनावणी लांबणीवर गेल्याचे सांगण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयामध्ये 4 ऑगस्टला महाराष्ट्राच्या या सत्तासंघर्षाची तिसरी सुनावणी झाली तेव्हा देखील ती पुढे ढकलण्यात आली होती. निवडणूक आयोगाने तातडीने निवडणूक चिन्हाबाबत निर्णय घेऊ नये असे निर्देश कोर्टाने दिले होते. नंतर निवडणूक आयोगातही पोहचलेला ठाकरे विरुद्ध शिंदे या वादामधील मुदत 23 ऑगस्टलाच संपत आहे. त्यामुळे आता उद्या घडणार्‍या अनेक घडामोडींकडे राज्याचे लक्ष असणार आहे. Maharashtra Political Crisis: राज्यातील सत्ता संघर्षावर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; उद्या कोर्टात व्हायचं ते होईल, माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास - उद्धव ठाकरे .

व्ही. एन. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. आता रमण्णा देखील 26 ऑगस्टला निवृत्त होत असल्याने त्यांच्या कडून याबाबत निर्णय घेतला जातोय का? याकडे दोन्ही गटाचे लक्ष असणार आहे. सरन्यायाधीश पदी रमण्णा यांच्यानंतर उदय लळीत येणार आहेत. सत्ता संघर्षातील किचकट बाबी लक्षात घेता त्रिसदस्यीय खंडपीठाकडून मोठ्या घटनापीठाकडे हे प्रकरण वर्ग करण्याचा विचार होऊ शकतो. त्यामुळे पुढील सुनावणींवर राज्यातील सरकारचं पुढील भवितव्य अवलंबून आहे.

एकनाथ शिंदे यांसह 50 आमदार शिवसेनेपासून वेगळे होत भाजपासोबत आले आणि त्यांनी नवं सरकार स्थापन केले आहे. एकनाथ शिंदे या राजकीय सत्तासंघर्षात मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहे. या सुनावणीमुळे मंत्रिमंडळ विस्तारनंतर  खातेवाटपही रेंगाळत होते पण ते देखील 14 ऑगस्टला  पार पडले आहे.