Maharashtra Political Crisis: शरद पवार रूपी आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलयं; छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांचा पहिल्याच मेळाव्यात हल्लाबोल
छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्या भाषणात पक्षातील अंतर्गत धुसफूस या फूटीमागील कारण असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं आहे.
शिवसेना (Shiv Sena) पक्षाप्रमाणे आता एनसीपी (NCP) मध्येही उभी फूट पडली असल्याचं चित्र समोर आले आहे. 2 जुलैच्या दुपारी शरद पवारांपासून दूर होत अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली 8 आमदारांचा शपथविधी पार पडला आहे. त्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे किती बलाबल असणार? याची चर्चा सुरू झाली आहे. अद्यापही त्याचा आकडा पूर्णपणे स्पष्ट झालेला नाही. मुंबईत आज दोन्ही पवारांनी शक्तिप्रदर्शन केलं आहे. अजित पवारांचा गट वांद्रे येथील एमआयटी सेंटर मध्ये मेळावा घेत आहे तर शरद पवार वाय बी चव्हाण सेंटर मध्ये पोहचले आहेत. शरद पवारांचे अनेक जुने स्नेही, खंदे कार्यकर्ते आणि जुनेजाणते नेते अजित पवारांसोबत जाणं अनेकांसाठी भुवया उंचवणारे ठरले. त्यावर भाष्य करताना आज छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी मनातील भडास बोलून दाखवली आहे.
छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्या भाषणात पक्षातील अंतर्गत धुसफूस या फूटीमागील कारण असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं आहे. शरद पवार हे आमचे विठ्ठल आहेत पण त्यांना बडव्यांनी घेरलं असल्याचं सांगत अप्रत्यक्षपणे त्यांनी शरद पवारांच्या जवळ असलेल्या काही नेत्यांवर निशाणा साधला आहे. अजित पवार समर्थक धनंजय मुंडे यांनी यावेळी पक्षात सर्वाधिक अपमान अजित पवारांनी भोगला असल्याचं बोलताना तुमचं मन एकदा सार्यांसमोर खुलं कराचं असाही प्रेमळ आर्जव केला आहे. 2014, 17,19 मध्ये घडलेल्या अनेक गोष्टींचं खापर अजित पवारांवर फोडल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान छगन भुजबळ यांनी नागालँडमध्ये राष्ट्रवादी पक्ष भाजपसोबत गेला. मग आम्हीही आता भाजपा सोबत जात आहोत आम्हालाही पाठिंबा द्या. सरकारच्या माध्यमातून चांगलं काम करू, असं भुजबळ म्हणाले आहेत. राष्ट्रवादीत पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होत नव्हत्या. महिला अध्यक्षांच्या निवडणुका झाल्या नाही. वारंवार सांगूनही नियुक्त्या झाल्या नाही. शरद पवार यांनी सांगूनही काहीही फरक पडत नव्हता.सगळी कामं थांबली होती. सांगूनही काम होत नव्हतं. असं म्हणत अप्रत्यक्षपणे छगन भुजबळ यांनी जयंत पाटीलांवर हल्लाबोल केला आहे. यावेळी 40 पेक्षा जास्त आमदारांची शक्ती आहे आता केवळ काहीजण आजारी आणि परदेशात असल्याने उपस्थित नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.