Maharashtra Political Crisis: नरेश मस्केंच्या राजीनामानंतर आनंद दिघेंचा पुतण्या केदार दिघे नवे ठाणे जिल्हा प्रमुख? केदार शिंदेंनीच फेसबूक पोस्ट द्वारा केला खुलासा
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली बाजू मांडल्यानंतर नरेश मस्के यांनी शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे.
आनंद दिघेंचा वारसा घेत राजकारणामध्ये शिवसेनेसोबत पुढे वाटचाल करणारे एकनाथ शिंदे यांनी आता शिवसेनेविरूद्धच दंड थोपटले आहेत. महाविकास आघाडीमधून शिवसेनेने बाहेर पडावं या आग्रही मागणीसाठी त्यांच्या सोबतीला शिवसेनेचे 39 आमदार उभे राहिले आहेत. यामुळे महाविकास आघाडी आणि शिवसेनेमध्येही उभी फूट पडली आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी सत्तेसाठी आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा करणार नसल्याचं म्हटलं आहे. पण केदार दिघे, आनंद दिघेंच्या पुतण्याने या लढाईत शिवसेनेची बाजू घेतल्याने पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे.
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली बाजू मांडल्यानंतर नरेश मस्के यांनी शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेनेनेही त्यांची हाकलपट्टी केल्याचं जाहीर केले आहे. यानंतर आता केदार दिघे ठाण्यात नवे जिल्हाप्रमुख झाल्याच्या बातम्या सोशल मीडीयात पसरत आहेत. या बातम्यांचं केदार दिघेंनी खंडन केले आहे. फेसबूक पोस्ट करत त्यांनी याची माहिती दिली आहे.
केदार दिघे पोस्ट
🙏जय महाराष्ट्र 🙏मी केदार दिघे याद्वारे असे नमूद करतो की, समाज माध्यमातून एक पोस्ट व्हायरल केली जात आहे की माझी म्हणजे #केदार #दिघे यांची ठाणे जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पण मी अत्यंत नम्रपणे, प्रामाणिकणे सांगू ईच्छितो की अश्या प्रकारची माझी वा कोणाचीच नियुक्ती अधिकृतपणे या क्षणापर्यंत माननीय शिवसेनापक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे अथवा मा.आदित्यजी ठाकरे अथवा शिवसेना पक्ष यांनी केलेली नाही. या द्वारे मी असे जाहीर करतो की शिवसेना पक्षाचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी पक्षसाठी काम करीत आहे 🙏कृपया कोणाचाही गैरसमज होऊ नये या साठी मी माझी बाजू इथे मांडत आहे. धन्यवाद 🙏जय महाराष्ट्र 🙏
सध्या एकनाथ शिंदे 39 शिवसेना आणि अन्य अपक्ष आमदारांसह गुवाहाटी मध्ये दाखल आहेत. शिवसेना हिंदुत्त्वापासून दूर गेली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस सेनेचं खच्चीकरण करत आहे त्यामुळे आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडावं अशी त्यांची मागणी आहे. या राजकीय घमासनीमध्ये सरकारचं काय होणार? एकनाथ शिंदे पुढे काय भूमिका घेणार? अशा अनेक प्रश्नांबाबत उत्सुकता आहे.