Maharashtra Political Crisis: शिवसैनिकांशी बोलताना उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे भावनिक; एकनाथ शिंदेंवर टीकेचे बाण

शिवसेना पुढे नेण्यासाठी मी सक्षम नसेल तर सांगा मी या पदावरूनही दूर होण्यास तयार आहे असे उद्धव ठाकरेंनी सांगताना बाळासाहेबांचं लाडकं अपत्य माझ्यापेक्षा शिवसेना आहे असं म्हणत भावनिक साद घातली आहे.

CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणूकीच्या रात्री शिवसेना फूटल्याची चर्चा सुरू झाली आणि बघता बघता शिवसेनेच्या आमदारांची बंडाळी समोर आली. आजच्या घडीला 35 पेक्षा जास्त शिवसेना आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात सामील झाले. मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचाच हा मास्टरप्लॅन होता अशी चर्चा सुरू झाली पण शिवसेना संघटना म्हणून जोडून ठेवण्यासाठी आज आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray), उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख यांच्याशी संवाद साधत मनातल्या भावना बोलून दाखवल्या. आपल्या भाषणामध्ये दोन्ही ठाकरे भावनिक झाल्याचं समोर आले आहे.

प्राईज टॅग लावल्यासारखे आमदार शिवसेनेला सोडून गेले आणि गेलेल्यांची गय केली जाणार नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी आई रश्मी ठाकरे यांनी हा धोका विरोधकांनी दिला असता तर इतकं वाईट वाटलं नसतं पण आपल्याच माणसांनी केलेला हा प्रकार त्रासदायक असल्याचं म्हटलं आहे. तर उद्धव ठाकरे यांनी देखील हा डाव भाजपाचाच असल्याचं म्हणताना अजूनही कोणाला जायचं असल्यास खुशाल जावं माझ्याकडून अडवणूक होणार नाही असे म्हटलं आहे. भाजपासोबत जावं यासाठी काही आमदारांचा दबाव आहे पण मातोश्री आणि ठाकरे कुटुंबावर घाणेरडे आरोप करणार्‍यांसोबत जाणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. हे देखील नक्की वाचा: Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे यांच्या गटात आमदार दिलीप लांडे सामील, शिवसेनेच्या 38 आमदारांचा पाठिंबा .

दरम्यान उद्धव ठाकरेंवर शिवसेना आमदारांना निधी मिळत नसल्याची आणि त्यांची भेट न झाल्याचे दोन मोठे आरोप बंडखोर नेत्यांनी केले. याचं उत्तर देताना आपण निधी सार्‍या स्तरांवर दिले आणि भेट न होण्यामागे कोविड आणि लागोपाठ झालेल्या दोन शस्त्रक्रिया हे असल्याचं म्हटलं आहे. तसेच एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता बोलताना आतापर्यंत सारी महत्त्वाची खाती त्यांना दिली. मुख्यमंत्री असूनही कोणतेच मोठे खाते माझ्याकडे नव्हते. तरीही असा दगा दिल्याचं म्हटलं आहे. तसेच स्वतः महत्त्वाचे मंत्री मुलगा खासदार मग मी माझ्या मुलाचा का विचार करू नये? असे म्हटलं आहे. तसेच विठ्ठल आणि बडव्यांचे आरोप आधी बाळा साहेब आणि माझ्यावर झाले नंतर ते आदित्य वरही होतील असे म्हटलं आहे.

शिवसेना पुढे नेण्यासाठी मी सक्षम नसेल तर सांगा मी या पदावरूनही दूर होण्यास तयार आहे असे उद्धव ठाकरेंनी सांगताना बाळासाहेबांचं लाडकं अपत्य माझ्यापेक्षा शिवसेना आहे असं म्हणत भावनिक साद घातली आहे.