पुणे: BJP MLA Mahesh Landge यांच्यासह 60 जणांविरोधात पोलिसांनी दाखल केला गुन्हा; मुलीच्या लग्नविधींच्या सोहळ्यात कोविड 19 नियमावलीचं उल्लंघन केल्याने कारवाई
तत्पूर्वी काही विधींना सुरूवात झाली.
भारतामध्ये कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये स्थिती चिंताजनक बनलेली असताना काही लोकप्रतिनिधीच नियम धाब्यावर बसवत समाजात चूकीच्या गोष्टींचा पायंडा पाडत असल्याचं बघायला मिळत आहेत. अशांपैकी एक म्हणजे भाजपा आमदार महेश लांडगे (BJP MLA Mahesh Landge). महेश लांडगेंनी त्यांच्या मुलीच्या लग्ना आधीच्या विधींमध्ये नियमावलीचं उल्लंघन करत डान्स करत असल्याचा व्हिडीओ वायरल झाल्यानंतर आता पोलिसांकडून त्यांच्यासह 60 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रात सध्या कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर लग्न सोहळ्यात केवळ 25 जणांच्या उपस्थितीला मान्यता आहे.
भाजप आमदार महेश लांडगे यांची मुलगी साक्षी लांडगे येत्या 6 जूनला लग्न बंधनात अडकणार आहे. तत्पूर्वी काही विधींना सुरूवात झाली. मीडीया रिपोर्ट्सनुसार, मांडव टहाळ कार्यक्रम नुकताच पार पडला आणि यावेळी समर्थकांच्या खांद्यावर बसून लांडगेंनी भंडारा उधळत डान्स केला. अल्पावधीतच तो व्हिडीओ वायरल देखील झाला. लांडगेंनी 25 जणांची उपस्थिती, विनामास्क लोकं आणि सोशल डिस्ट्न्सिंगचे नियम मोडल्याप्रकरणी त्यांच्यावर महाराष्ट्र पोलिसांनि बडगा उचलला आहे.
महेश लांडगेंचा वायरल व्हिडीओ
भोसरी विधानसभा मतदारसंघातून महेश लांडगे आमदार आहेत. मागील वर्षी त्यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर पुण्यातील हॉस्पिटल मध्ये उपचार झाल्यानंतर त्यांनी कोविड वर मात केली आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरीही ग्रामिण भागात होणारी रूग्णवाढ चिंता वाढवणारी असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नुकत्याच झालेल्या फेसबूक लाईव्ह मध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता लोकप्रतिनिधीच नियम पायदळी तुडवत असतील तर कोरोनामुक्तीचे आपले प्रयत्न कसे यशस्वी ठरणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे.