Maharashtra Police Bharti 2022: महाराष्ट्र पोलीस भरती, कोणती कागदपत्रे आवश्यक? इथे पाहा यादी
अनेकांना इच्छा असते पोलीस भरतीची पण अनेकांना हे माहती नसते की त्यासाठी आवश्यक कागदपत्रे नेमकी काय हवी असतात.
महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलात काम करायचे असे स्वप्न महाराष्ट्रातील अनेक तरुण बाळगून असतात. त्यासाठी ते महिनोनमहिने प्रयत्न करत असतात. प्रदीर्घ काळ वाट पाहिल्यावर मग कधीतरी अचानक पोलीस भरती निघते आणि तरुणांच्या आशा पल्लवीत होतात. महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police Bharti 2022) विभागातील शिपाई, हेड कॉन्स्टेबल आणि इतर अशा विविध पदांसाठी भरती निघते. अनेकांना इच्छा असते पोलीस भरतीची पण अनेकांना हे माहती नसते की त्यासाठी आवश्यक कागदपत्रे नेमकी काय हवी असतात. म्हणूनच जाणून घ्या पोलीस भरतीसाठी कोणकोणती कागदपत्रे (Police Bharti Documents) आवश्यक असतात. तसेच, पोलीस भरती प्रक्रिया नेमकी पारत तरी पडते कशी?
निवड प्रक्रिया
महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी राज्यभरातून अनेक तरुण उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करतात. निवड प्रक्रियेत शारीरिक चाचण्या, लेखी परीक्षा, वैद्यकीय चाचण्या आणि कागदपत्र पडताळणी यांचा समावेश होतो. वरवर पाहता ही प्रक्रिया अगदी साधी वाटत असली तरी, पोलीस भारती परीक्षेची शेवटची प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असते. कारण या प्रक्रियेनंतरच उमेदवाराला नोकरीत रुजू होता येते. ही प्रक्रिया म्हणजे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता. म्हणूनच जाणून घ्या पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे.
पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे
महाराष्ट्र सरकारच्या नियमानुसार आणि सरकारी जाहीरातींमध्ये उल्लेखीत असलेली पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे
- शाळा सोडल्याचा दाखला / १० वी चे प्रमाणपत्र.
- जन्म दाखला.
- 12 वी शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र गुणपत्रक.
- अधिवास (डोमेसाईल) प्रमाणपत्र.
- संबंधित जात प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित प्रवर्गाचे विधीग्राह्य जात प्रमाणपत्र व
- उन्नत व प्रगत गटात (नॉन क्रिमिलेयर) मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र (अ.जा./अ.ज. वगळून).
- समांतर आरक्षण (पोलीस पाल्य/माजी सैनिक/अशंकालीन/भुकंपग्रस्त/होमगार्ड / खेळाडू /
- प्रकल्पग्रस्त / ३०% महिला आरक्षण/अनाथ इ.) मागणी केली असल्यास त्याबद्दलचे विधीग्राह्य प्रमाणपत्र. (हेही वाचा, Maharashtra Police Recruitment 2022: तरुणांनो खुशखबर! राज्य पोलीस दलात 20 हजार पदांची भरती, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती)
- आधारकार्ड (ऐच्छीक).
- प्रमाणपत्रांच्या छाननीच्या वेळी लागू असलेल्या प्रमाणपत्रांची मूळ (Original) व सुस्पष्ट दिसतील अशा साक्षांकित केलेल्या दोन छायांकित प्रती उमेदवाराने कार्यालयास सादर करणे आवश्यक
उमेदवाराने प्रमाणपत्र मिळण्याकरिता सादर केलेल्या अर्जाच्या पावत्या ग्राह्य धरल्या जात नाहीत.
- मूळ प्रमाणपत्रे उपलब्ध नसल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येऊ शकते.
- जात वैधता प्रमाणपत्र वगळून इतर सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे ही कागदपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक.
- उमेदवाराने पोलीस भरतीकरिता येताना या कार्यालयाकडुन निर्गमीत केलेले पोलीस भरती प्रवेशपत्र सोबत आणने आवश्यक.
- उमेदवाराने पोलीस भरतीकरिता येतांना त्यांनी सादर केलेल्या आवेदन अर्जाची (रजिस्ट्रेशन आयडी नमूद असलेली) प्रत प्रवेशपत्रांच्या (Admit card) २ प्रती.
- अलिकडील काढलेले 2 पासपोर्ट साईज फोटो (आवेदन अर्ज भरतांना सादर केलेले) इत्यादी न चुकता सोबत आवश्यक.
- मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गात (Unreserved) अर्ज करु शकतात, परंतू खुल्या प्रवर्गातील (Unreserved) उमेदवार मागासवर्गीय प्रवर्गात अर्ज करु शकत नाहीत.
- आवेदन अर्ज सादर करण्यापूर्वीच (संबंधीत पोलीस घटकाच्या आस्थापनेवर त्या मागास प्रवर्गासाठी पदे रिक्त असल्याबाबत खात्री करुन) त्यांनी कोणत्या प्रवर्गातून अर्ज भरावयाचा आहे हे निश्चित करावे. त्यानंतरच आवेदन अर्जात तशी माहिती नोंद करावी. संबंधित प्रवर्गाचा निर्विवाद दावा अर्ज भरताना करावा. नंतर प्रवर्ग बदलण्याबाबत उमेदवारांकडून अभिवेदन अथवा दावा / तक्रार विचारात घेतली जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- कागदपत्र पडताळणीदरम्यान सादर करण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रावर संपूर्ण नाव, आवश्यक प्रमाणपत्राचा निर्गमित दिनांक, जात प्रमाणपत्र असल्यास जात व जातीचे वर्गीकरण [SC, ST, OBC, VJ-A (DT-A), NT-B, NT-C, NT-D, SBC & EWS] स्पष्टपणे नमूद असणे आवश्यक आहेत.
जातीचे प्रमाणपत्र व नॉन क्रिमेलियर प्रमाणपत्र विहित नमुन्यातील असावे.
- आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी मागासवर्गीय उमेदवारांना सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले स्वतंत्र जात प्रमाणपत्र व स्वतंत्र नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (अ.जा. व अ.ज. प्रवर्ग वगळून) देणे बंधनकारक आहे.
- सदर प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर न करणाऱ्या उमेदवारास जात प्रवर्गाचा / समांतर आरक्षणाचा लाभ मिळू शकणार नाही
- आवेदन अर्जात दावा केल्यानुसार कागदपत्रे पडताळणीच्या वेळी योग्य कागदपत्रे नसल्यास उमेदवारास गुणवत्तेनुसार सर्वसाधारण मध्ये समाविष्ट करण्यात येईल. सेवाप्रवेश नियमांमधील सर्व अर्टीची व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पुर्तता करणारे उमेदवार पुढील आवश्यक त्या चाचणीसाठी पात्र राहतील.
- कागदपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवाराने, त्यांनी ऑनलाईन पध्दतीने सादर केलेल्या आवेदन अर्जाची (अॅप्लीकेशन आयडी नमूद असलेली) प्रत, पोलीस भरतीकरीता देण्यात आलेल्या शारीरिक चाचणी व लेखी परीक्षेच्या प्रवेशपत्रांची प्रिंट व २ पासपोर्ट साईज फोटो सोबत आणणे आवश्यक आहे.
पोलीस भरतीसाठी उतरणाऱ्या उमेदवाराने आपली शारीरिक क्षमता, बुद्धीमत्ता याच्या तत्परतेसोबतच कागदपत्रांनी सुद्धा तितकेच तत्पर असायला हवे. तुम्ही परीक्षा, मुलाखत आणि शारीरिक चाचणी आदींमधून यशस्वी उत्तीर्ण होऊ शकता. परंतू, इतके सगळे होऊन जर आवश्यक कागदपत्रेच नसतील तर मात्र नक्कीच तुमची अडचण होऊ शकते.