Maharashtra Onion Price: महाराष्ट्रात दिवाळीपूर्वी जनतेला दिलासा; कांदा 20 रुपयांनी स्वस्त, डिसेंबरपर्यंत बाजारभावात राहणार चढ-उतार

तोपर्यंत बाजारभावात चढ-उतार होत राहतील. दर काही प्रमाणात खाली आले असले तरी पुन्हा दर वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Onion | Representational image (Photo Credits: pxhere)

सण येताच लोकांच्या खर्चात मोठी वाढ होते. त्यात दिवाळी सारखा सण असेल तर सामान्य कुटुंबाचे खर्चाचे गणित हमखास बिघडते. सण-उत्सवाच्या काळात दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या जीवनावश्यक वस्तूही महागल्या, तर त्याचा लोकांच्या खिशावर मोठा परिणाम होतो. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील जनतेच्या बाबतीत असेच काहीसे घडत आहे. राज्यात कांद्याचे दर अनेक ठिकाणी 70-80 रुपयांपर्यंत तर काही ठिकाणी 80-100 रुपयांपर्यंत वाढले होते, परंतु आता याबाबत दिवाळीपूर्वीच महाराष्ट्रातील जनतेला दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रात कांदा 20 रुपयांनी स्वस्त झाला आहे.

मुंबई बाजार समितीत 30 रुपयांवरून 54 रुपये किलोवर गेलेला कांदा 28 ते 48 रुपये प्रतिकिलोवर आला आहे. किरकोळ बाजारात भाव 80 ते 100 रुपयांवरून 60 ते 75 रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. महाराष्ट्रात दररोज कांद्याच्या दरात चढ-उतार होऊ लागले आहेत. भाव वाढू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला असून ग्राहकही चिंतेत पडले होते, मात्र आता पुन्हा भाव घसरू लागले आहेत.

अहवालानुसार, गेल्या दोन दिवसांपासून कांद्याच्या किमती पुन्हा घसरायला लागल्या आहेत, ज्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मुंबई बाजार समितीत गुरुवारी 761 टन कांद्याची आवक झाली आणि 28 ते 48 रुपये किलो दराने कांद्याची विक्री झाली. किलोमागे दोन ते सहा रुपयांची घसरण दिसून आली. ज्याचा थेट परिणाम किरकोळ बाजारावरही होत आहे. (हेही वाचा: Teachers' Dues: शिक्षकांच्या थकबाकीबाबतच्या आदेशाचे पालन करण्यात सरकार अपयशी; मुंबई उच्च न्यायालयाने महाशिक्षण विभागाच्या सचिवांविरुद्ध जारी केला वॉरंट)

दरम्यान, डिसेंबरमध्ये नवीन कांदा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल. तोपर्यंत बाजारभावात चढ-उतार होत राहतील. दर काही प्रमाणात खाली आले असले तरी पुन्हा दर वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. किरकोळ बाजारातही दर कमी झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी कांदा 80 ते 100 रुपये किलोने विकला जात होता. गुरुवारी हे दर 60 ते 75 रुपयांपर्यंत घसरले आहेत. अशा परिस्थितीत दिवाळीच्या मुहूर्तावर कांदा 20 रुपयांनी स्वस्त झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.