Maharashtra: राज्यात पुढील वर्षापासून इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी 4 विषयांचे एकच पाठ्यपुस्तक असणार

त्यानुसार 2022-23 या वर्षापासून इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी 4 विषयांचे एकच पाठ्यपुस्तक असेल असे सांगण्यात आले आहे.

Image Used For Representation (Photo Credits: Facebook)

Pune: इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी आता राज्यातील शालेय विभागाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार 2022-23 या वर्षापासून इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी 4 विषयांचे एकच पाठ्यपुस्तक असेल असे सांगण्यात आले आहे. हा निर्णय त्यापुढील वर्गांसाठी सुद्धा लवकरच घेतला जाईल असे ही स्पष्ट करण्यात आले आहे.(Nashik School Reopen: नाशिक शहरातील शाळा 13 डिसेंबरपासून सुरु, पहिली ते सातवीचे वर्ग भरणार)

या विद्यार्थ्यांना पहिलीत इंग्रजी, मराठी, गणित, खेळा आणि शिका असे विषय शिकवले जात असून आता ते एकाच पाठ्यपुस्तकात समाविष्ट केले जाणार आहेत. तर प्रत्येक विषयासाठी वेगळे पाठ्यपुस्तक दप्तरातून घेऊन जाण्याऐवजी आता विद्यार्थ्यांना 4 विषयांचे एकच पुस्तक आता सोबत आणावे लागणार आहे. परंतु 1,2,3 आणि 4 अशा प्रत्येक चाचणीनुसार ते विभागले जाणार आहे.

सध्या पहिलीतील विद्यार्थी हा 6 वर्षाचा असेल तर त्याच्या/तिच्या दप्तरात कमीतकमी 830 ग्रॅमचे पुस्तकांचे वजन असते. त्याचसोबत पाण्याची बॉटल, डबा आणि वह्या या सर्व गोष्टींमुळे त्याचे वजन जवळजवळ 1 किलो होते. परंतु आता नव्या पद्धतीमुळे पाठ्यपुस्तकांचे वजन 210 ग्रॅमने कमी होणार आहे. प्रायोगिक तत्वावर पुस्तके 488 मॉडेलल शाळांना दिली गेली आणि त्यांच्याकडून उत्तम प्रतिसाद सुद्धा आल्याचे बालभारतीचे संचालक विवेक गोसावी यांनी म्हटले.

गोसावी यांनी असे म्हटले की, शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी एकात्मिक द्विभाषिक पाठ्यपुस्तक हे राज्यभरातील पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी काढले जाणार आहे. त्यानंतर दुसरी आणि पुढील वर्गांसाठी सुद्धा तिच पद्धत वापरली जाणार. तर नव्या शैक्षिणक योजनेनुसार आम्ही वेळोवेळी बदल करणार आहोत. आम्हाला शिक्षकांकडून सुद्धा या पाठ्यपुस्तकांसंदर्भात उत्तम प्रतिसाद दिला गेला. त्याचसोबत एकात्मिक पाठ्यपुस्तकाची पद्धत विद्यार्थ्यांना सुद्धा आवडल्याचे त्यांनी पुढे म्हटले.