Maharashtra Weather Update: मुंबई शहर आणि उपनगरांत पुढील 24 तासांमध्ये हलक्या पावसाची शक्यता; कोकणात समुद्री पर्यटन बंद

येत्या 27 मे ते 31 मे दरम्यान, मुंबईमध्ये पाऊस पडण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे.

Mumbai Rain

राज्यात  पुढील 24 तासामध्ये कमाल तापमान 34 तर किमान तापमान 29 अंश सेल्सिअस राहील असं सांगण्यात आलं आहे. हवामान विभागाने यांसंदर्भातील माहिती दिली आहे. आजपासून कोकणातील समुद्री पर्यटन पुढचे तीन महिने बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरांसाठी पुढील 24 तासांमध्ये हलक्या पावसाची शक्यता असून आकाश अंशत ढगाळ राहण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे.  कोकणात मान्सूनचे आगमन हे 10 जूनपर्यंत होणार असून या ठिकाणी मासेमारीसाठीही बंदी घालण्यात आली आहे. कोकणातील पर्यटन बंद झाल्यामुळे पर्यटकांचा मात्र हिरमोड झाल्याचं दिसत आहे.  (हेही वाचा - Mumbai Rains Forecast: मुंबईकरांना दिलासा! शहरात मे महिन्याच्या अखेरीसच पावसाला होणार सुरुवात, जाणून घ्या पुढील काही दिवसांचा हवामान अंदाज)

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळासह सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) वाहण्याची शक्यता आहे. या भागात येत्या 24 तासांमध्ये हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, आणि सोसाट्याचा वाऱ्यासह हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मान्सूनचे आगमन 31 मे दरम्यान केरळात तर 10 जूनदरम्यान मुंबईसह कोकणात तर 15 जूनदरम्यान कोकणातून सह्याद्रीचा घाटमाथा ओलांडून नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात तसेच मराठवाडा, विदर्भात होऊ शकते. मान्सूनची बंगाल शाखा कदाचित लवकर सक्रिय होऊ शकते. तसे झाल्यास सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी व लगतच्या जिल्ह्यांत, मध्य महाराष्ट्र व खान्देशपेक्षा मान्सूनचे आगमन तेथे अगोदर होऊ शकते.