मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या अनेक स्थानकात रेल्वे ट्रॅकमध्ये पाणी साचल्याने वाहतूक पूर्णतः कोलमडली आहे. दरम्यान अंधेरी व चर्चगेट, तसेच वसई ते विरार दरम्यान लोकलसेवा बंद पडली आहे. तूर्तास वसई ते अंधेरी दरम्यान धीम्या गतीने लोकलची वाहतूक सुरु असल्याची माहिती पश्चिम रेल्वे तर्फे देण्यात आली आहे.
पालघर जिल्ह्यातील तुळींज पोलीस स्टेशन मध्ये पावसाचे पाणी शिरूल्याची माहिती सध्या समोर येत आहे. पोलीस स्थानकातील टेबल खुर्च्या सर्व काही पावसाच्या पाण्यात असून जवळपास कंबरेभर पाणी साचल्याने समजत आहे.
अतिवृष्टीमुळे मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून कुर्ला येथील क्रांती नगर सह काही सखल भागात पाणी साचले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव एनडीआरएफ पथकाने परिसरातील 1300 नागरिकांना सुरक्षित स्थानी हलविले आहे.
मुंबईत पावसाचे स्वरूप वेळेनुरूप आणखीनच रौद्र होत आहे. अशातच सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच मासिक सरासरीच्या 341 मिमी पावसाचा आकडा ओलांडून अवघ्या चार दिवसात 403 मिमी इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. याबाबत स्कायमेट मराठीच्या माहितीनुसार केबवल सांताक्रूझ मध्येच 121 तर ठाण्यात 173 मिमी पाऊस पडला आहे.
मुसळधार पावसामुळे कुर्ला ते चुनाभट्टी दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने लोकलची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. दरम्यान सीएसएमटी ते अंधेरी / गोरेगाव तसेच वाशी पांवे ट्रान्सहार्बर मार्गावर रेल्वे वाहतूक तूर्तास तरी सुरळीत आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने ट्विट करून दिली आहे.
मुंबई सह ठाणे व रायगड येथे येत्या काही तासात अतिवृष्टीचा इशारा देत हवामान खात्याने रेड अलर्ट जाहीर केला आहे. तसेच नागरिकांना सुरक्षित स्थानी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान आज सकाळी या भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता, मात्र पावसाचे रौद्र रूप पाहता खबरदारीचे सूचना देण्यात आली आहे.
पुणे येथील धरणक्षेत्रात पावसाचं जोर वाढल्याने सकाळपासून मुख्य शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवाट झाली आहे. यानुसार, आज सकाळी मुळशी धरणातून 10 हजार क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले तर काही वेळापूर्वी पवना धरणातून 12 हजार 600 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. याशिवाय खडकवासला धरणातून सुद्धा 27 हजार क्युसेक पाणी सोडण्यात येणार असल्याचे समजत आहे.
मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेच्या वाहतुकीला देखील फटका बसला आहे. नागोठणे ते रोह्याच्या दरम्यान रेल्वेरुळावर माती आणि चिखल वाहत आल्याने डाऊन मार्गावरील वाहतूक कोलमडली आहे. दरम्यान अप मार्ग वाहतुकीसाठी सुरु आहे.
काही वेळापूर्वी तांत्रिक अडचणीमुळे विस्कळीत झालेली पश्चिम रेल्वेची सेवा सुरळीत झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे. परिणामी चर्चगेट ते विरार दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील लोकलसेवा पुन्हा सुरु झाली आहे. याशिवाय वलसाड येथूनही रेल्वेसेवा पुर्वव्रत करण्यात कर्मचाऱ्यांना यश आले आहे.
मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली असून गेल्या 24 तासांच्या कालावधीत तब्बल 118 मि.मी.पावसाचे नोंद झाली आहे. पावसाचा हा जोर पुढील दोन दिवस कायम राहणार असल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात येत आहे.
Mumbai Rains and Traffic Update: मुंबई शहर (Mumbai City) आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मुंबई शहरांसह उपनगरांमध्येही सखल भागात पाणी साचले आहे. मुंबईत इतक्या तासांच्या पावसानंतर पश्चिम रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे पण, मध्य रेल्वे अद्यापही ठप्प आहे. मुंबई सतत होणाऱ्या पावसामुळे तिन्ही मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली होती. तर, रस्तेवाहतुकीवर वाहतुककोंडीमुळे मोठा परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेने प्रवाश्यांसाठी रद्द आणि उशीरा झालेल्या गाड्यांविषयी Update जारी केले आहे. सरकारने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर, संभाव्य धोका टाळण्याच्या दृष्टीने शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांतील पाऊस आणि उर्वरीत महाराष्ट्रातील पावसाच्या ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी अपडेट राहा लेटेस्टली मराठी सोबत.